हिमांशूची भेदक गोलंदाजी : सुपर सिक्स गटात पहिला विजययवतमाळ : जवाहरलाल दर्डा इंग्लिश मीडियम स्कूलच्या (जेडी) हिमांशू ठाकूर याने भेदक गोलंदाजी करीत (११ धावा पाच बळी) प्रतिस्पर्धी शिवाजी विद्यालयाच्या अर्ध्या संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवून जेडी संघाला सुपर सिक्स गटात पहिल्या विजयाची चव चाखवून दिली.येथील पोस्टल मैदानावर ९ नोव्हेंबरपासून सुरू असलेल्या वायपीएल-२०१४ मध्ये मंगळवारपासून ‘सुपर सिक्स’ गटातील सामने सुरू झाले. प्रत्येकच सामना अटीतटीचा होत असल्याने प्रेक्षकांना दर्जेदार क्रिकेटचा रोमांच अनुभवायला मिळत आहे. जेडीविरुद्ध शिवाजी विद्यालय संघादरम्यान चुरशीचा सामना झाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या जेडी संघाने शिवम शमी २१, आदर्श सिंग २५ या फलंदाजांच्या बळावर निर्धारित षटकात सर्व बाद ८७ धावा उभारल्या. प्रत्युत्तरात शिवाजी विद्यालयाचा संघ विजयाच्या आशेने मैदानात उतरला. मात्र हिमांशूने घातक गोलंदाजी करीत चार षटकात केवळ ११ धावा देत ५ बळी घेत फलंदाजांना धावा काढण्याची कुठेही संधी दिली नाही. केवळ सुमीत काटे हा फलंदाज (१६) खेळपट्टीवर काही वेळ टिकून होता. भावीनने एक गडी बाद करीत हिमांशूला साथ दिली. हिमांशूला ‘मॅन आॅफ द मॅच’ पुरस्कार देण्यात आला.दुसरा सामना अतिशय रोमहर्षक सामना झाला. गत सामन्यात वायपीएस संघाकडून सपाटून मार खाणाऱ्या सेंट अलॉयसेस संघाने या सामन्यात बलाढ्य जायन्ट इंग्लिश संघावर केवळ दोन चेंडू राखून रोमहर्षक विजय प्राप्त केला. जायन्ट इंग्लिश स्कूल संघाने १४.३ षटकात सर्व बाद ८९ धावसंख्या उभारली. प्रत्युत्तरात सेंट अलॉयसेस संघाने प्रारंभ चांगला केला. मात्र विहार लाभसेटवार (३), सुश्रुत आगरकर (२) या गोलंदाजांच्या आक्रमणापुढे फलंदाज झटपट बाद होत होते. तेव्हा हर्षवर्धन गुल्हाने याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावित नाबाद २० धावा काढल्या. फारूकने दहा धावा करीत त्याला उत्तम साथ दिली. या दोघांच्या बळावर संघाने १४.४ षटकात (नऊ बाद ९०) विजय प्राप्त केला.हर्षवर्धन अर्थातच ‘सामनावीर’ ठरला. त्याला रोख ५०० रुपये देण्यात आले. (क्रीडा प्रतिनिधी)
जवाहरलाल दर्डा शाळेचा शानदार विजय
By admin | Updated: November 19, 2014 22:49 IST