रूपेश उत्तरवार यवतमाळ तंबाखूच्या नियमित सेवनाने कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला आळा घालण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी अभिनव उपक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. यात जिल्ह्यातील १०० शाळांमध्ये अंमलबजावणी सुरू झाली असून आतापर्यंत १३ शाळा तंबाखूमुक्त झाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हा प्रयोग राबविला जाणार असून याची दखल ‘सलाम मुंबई’ फाऊंडेशनने घेतली आहे. बालवयातच चांगले संस्कार रूजविता येतात. त्यामुळे शाळांना संस्काराचे केंद्र म्हटले जाते. यातून शाळांमध्ये जनजागृती करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या १०० शाळांनी तंबाखू मुक्तीचा विडा उचलला आहे. यासाठी या शाळा कामाला लागल्या आहेत. शाळास्तरावर ही मोहीम राबविली जात आहे. यामध्ये शाळा केंदबिंदू ठेवण्यात आली आहे. अलीकडच्या काळात शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये तंबाखू सेवनाचे प्रकार वाढल्याची बाब पुढे आली आहे. त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे.शाळेच्या बाहेर आणि आत व्यसनमुक्ती संदेश फलक लावण्यात आले आहेत. त्यात तंबाखूचे दुष्परिणाम सचित्र दर्शविण्यात आले आहेत. कायद्याअंतर्गत होणारा दंड आणि शिक्षेची जाणीव करणारे आदेश शाळेत दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. शाळेच्या १०० मीटर परिसरात तंबाखू अथवा तत्सम वस्तू विकल्या जाणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. परिसरात तंबाखू अथवा सिगरेट विकली जाणार नाही याचे फलक लावण्यात आले आहे. विद्यार्थी तंबाखू खाणार नाही, शिक्षकही सेवन करणार नाही, अशी प्रतिज्ञा शाळास्तरावर घेण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर विद्यार्थ्यांचे नातेवाईक तंबाखूचे सेवन करणार नाही यासाठी शाळकरी विद्यार्थी त्यांना दुष्परिणाम पटवून देतील. त्यातून तंबाखूमुक्तीची चळवळ राबविली जाईल. जिल्ह्यातील १३ शाळांनी तंबाखूमुक्तीची घोषणा केली असून त्यात महागाव तालुक्यातील मुडाणा, खडका, उमरखेडमधील वरूडबिबी, चिंचोली संगम, बाळदी, जुनोना, दिग्रस तालुक्यातील कलगाव, बाभूळगाव तालुक्यातील गणोरी गावांतील शाळांचा समावेश आहे.
तंबाखूच्या विळख्यातून गावमुक्ती
By admin | Updated: February 18, 2015 02:16 IST