अर्थचक्र थांबले : करवसुली नाही, कर्मचाऱ्यांचे वेतन थकले यवतमाळ : ग्रामपंचायतींनी गृहकर वसूल करू नये, असे निर्देश राज्य शासनाने दिले आहेत. उच्च न्यायालयात सुरू असलेल्या याचिकेच्या सुणावनीदरम्यान हा निर्णय घेण्यात आला. मात्र यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सामान्य फंडात एकही रुपयाही जमा झालेला नाही. परिणामी जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे अर्थचक्र थांबले आहे. ग्रामपंचायतींच्या गृहकर वसुलीला १ एप्रिलपासून स्थगिती देण्यात आली आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत ही स्थगिती आहे. गृहकराच्या निर्धारणासंदर्भात खटला सुरू असल्याने न्यायालयाने निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील एक हजार २०७ ग्रामपंचायतीमध्ये मार्च अखेर गृहकरातून १९ कोटी ७६ लाख ४३ हजार १७० रुपये इतके उत्पन्न अपेक्षित होते. वसुली बंद असल्याने ग्रामपंचायतींची दैनंदिन कामे खोळंबली आहेत. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना एप्रिलपासून वेतन नाही. (कार्यालय प्रतिनिधी) पाणीपुरवठा योजनेचा प्रश्नपाणीपुरवठा योजनेच्या देखभाल दुरूस्तीचा प्रश्न निर्माण झाला आहे. ब्लिचिंग पावडर खरेदी, गावातील गवत निर्मूलन, नाली सफाई यासारखी कामे पूर्णत: थांबली आहेत. केवळ पाणी करवसुलीतून आलेल्या रकमेवर जेमतेम खर्च भागविण्यात येत आहे. आजही अनेक ग्रामपंचायतींकडे गृहकर आणि पाणीकर वसुलीशिवाय दुसरा कोणताच शाश्वत उत्पन्नाचा मार्ग नाही. त्यामुळे गावचा कारभार कसा चालवायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नियमबाह्य प्रकाराला जन्मकाही ठिकाणी तात्पुरती उपाययोजना म्हणून शासनाच्या विविध निधीतील रक्कम दैनंदिन कामांसाठी वापरली जात आहे. मात्र हा प्रकार नियमबाह्य असल्याने पदाधिकारी व ग्रामसेवकांच्या अंगलट येणार आहे. दुसरा कोणताच पर्याय नसल्याने कसेबसे दिवस काढणे सुरू असल्याचे ग्रामसेवकांकडून सांगण्यात येते. तसेही दिवळीनंतरच गृहकर वसुलीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. आता ही पूर्णत: बंद असल्याने अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे.
ग्रामपंचायतींची तिजोरी रिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2015 01:56 IST