यवतमाळ : विविध कारणे सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनवाढ व महागाई भत्त्यापासून वंचित ठेवले जात आहे, असा आरोप महाराष्ट्र राज्य ग्रामीण ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस लक्ष्मण मोहुर्ले यांनी केला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कामाचा बोझा दिवसेंदिवस वाढत आहे. ही बाब लक्षात घेत उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने ३० आॅक्टोबर २०१३ च्या परिपत्रकानुसार वाढीव किमान वेतन आणि निर्धारित दरानुसार विशेष महागाई भत्ता देण्याचे आदेश काढले. वाढीव किमान वेतनाचे ५० टक्के अनुदान आॅगस्ट २०१३ ते डिसेंबर २०१३ या पाच महिन्यांच्या कालावधीसाठी सर्व पंचायत समितीमार्फत ग्रामपंचायतीकडे वळते करण्यात आले. मात्र बहुतांश ग्रामपंचायतींनी शासनाच्या या आदेशाला केराची टोपली दाखविली. विविध कारणे सांगत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाढीव किमान वेतन आणि विशेष महागाई भत्ता देण्यास टाळाटाळ होत आहे. या बाबीला प्रशासनाची उदासीनता कारणीभूत असल्याचे मोहुर्ले यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)
ग्रामपंचायत कर्मचारी वेतनवाढ व महागाई भत्त्यापासून वंचित
By admin | Updated: October 16, 2014 23:31 IST