यवतमाळ : गोवारी जमातीला आदिवासींचा लाभ द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी शुक्रवार, २१ आॅक्टोबरला जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आदिवासींमध्ये सामावून घेण्यासाठी गोवारी समाज वारंवार रस्त्यावर उतरला आहे. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले नाही. अशातच गोवारी जमातीला विशेष मागास प्रवर्गात समाविष्ट केले. त्यात ४० उच्च जातींचा समावेश करून गोवारी समाजाला आदिवासीत्वापासून दूर ठेवले. त्यामुळे आर्थिक दुर्बलांसह गरिबांना शासकीय योजनांचा लाभ होत नाही. शिवाय उच्च शिक्षणामध्ये ५० टक्क्यावर आरक्षण नाही. गतवर्षी हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढण्यात आला होता. आता पुन्हा शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आदिवासी गोवारी जमातीचे नागरिक रस्त्यावर उतरणार आहे. यासंदर्भात बैठक होवून मोर्चाचे नियोजन करण्यात आले. स्थानिक पोस्टल ग्राऊंडवरून मोर्चा निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. यात समाजबांधव पारंपरिक पोषाखात सहभाग नोंदविणार आहे. या मोर्चात जिल्हाभरातील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दिलीप नेहारे तथा आयोजन समितीने केले. (वार्ताहर)
गोवारी जमातीचा उद्या मोर्चा
By admin | Updated: October 20, 2016 01:43 IST