पांढरकवडा : राज्याचे राज्यपालांचे सचिव परीमलसिंग यांनी तालुक्यातील पेसा अंतर्गत येणाऱ्या मांगुर्डा व मुची गावामध्ये गुरूवारी अकस्मात भेट दिली.पेसा कायद्याची अंमलबजावणी, वन हक्काबाबत स्थिती, शेतकरी आत्म्हत्याबाबत माहिती तसेच पेसाअंतर्गत येणाऱ्या योजनांच्या स्थितीचा गावकऱ्यांसोबत चर्चा करून माहिती घेत सचिवांनी प्रत्यक्ष पाहणी केली. परीमलसिंग यांनी गुरूवारी दुपारी प्रथम मांगुर्डा येथे जाऊन पेसाबद्दल गावकऱ्यांशी चर्चा केली. पेसा समिती स्थापन झाली किंवा नाही, याबबद्दल त्यांनी माहिती घेतली. वन हक्काबाबत स्थितीची पाहणी केली. एमआरईजीएसच्या कामांचीही माहिती जाणून घेतली. तसेच आदिवासींना पुरविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा आढावा घेतला. आरोग्य, पिण्याचे पाणी, अंगणवाडी इत्यादींची पाहणी करून गावांमधील समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर जवळच असलेल्या मुची येथे कृषी विभागातर्फे बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याची पाहणी केली. त्या बंधाऱ्यामध्ये गाळाबाबत योग्य दिशेने काम करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या. तसेच जवळच असलेल्या बायोगॅसची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग, मुख्याधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, उपवनसंरक्षक जी.गुरूप्रसाद, उपविभागीय अधिकारी संदीप अपार, तहसीलदार शैलेश काळे, गटविकास अधिकारी राजेश गायनार तसेच विविध शासकीय कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)
राज्यपालांच्या सचिवांची ‘पेसा’तील गावांना अकस्मात भेट
By admin | Updated: May 22, 2015 00:14 IST