मिशन डिप निळोणा : नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनयवतमाळ : मागील वर्षी मिशन डिप निळोणा अंतर्गत शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून ३५ हजार ट्रॅक्टर गाळ काढून जल साठवणूक क्षमता एक लाख क्युबीक मिटरने वाढविण्यात आली. आता यावर्षी एक लाख ट्रॅक्टर गाळ काढून धरणाची जलसाठवणूक क्षमता तीन लाख क्यूबीक मिटरने वाढविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातून एक महिन्याचा जलसाठा निळोणा धरणात वाढणार आहे. यावर्षीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी जवळपास दीड कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे प्रयास यवतमाळतर्फे जनतेने यासाठी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गुरुवार, २८ एप्रिल रोजी या प्रकल्पास लोकसहभागातून मदत मिळवून देण्यासाठी शहरात तेरा विविध ठिकाणी बूथ उभारून सकाळी ९ ते सायंकाळी ६ पर्यंत जनतेकडून मदत स्वीकारण्यात येणार आहे. संकेतस्थळावर भेट देऊनसुद्धा इच्छूक नागरिक देणगी देऊ शकतील. ज्यांना थेट बुथवर देणगी द्यावयाची आहे, त्यांच्यासाठी यवतमाळ शहरातील दर्डानगर (पाण्याच्या टाकीजवळ), दाते कॉलेज चौक, दवा बाजार (येरावार चौक), शारदा चौक, मारवाडी चौक, दृष्टी आय केअर (धामणगाव रोड), जिल्हा परिषद इमारत, व्यंकटेश ट्रेडर्स (आर्णी रोड), दत्त चौक (जुना दवा बाजार जवळ), तहसील चौक, गांधी चौक व जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी देणगी स्वीकारण्यात येणार आहे. २८ एप्रिल पर्यंत अडीच हजारांपेक्षा अधिक लोकांनी आॅनलाईन डोनेशन दिल्यास हा प्रकल्प जनसहभागाचा आहे, हे सिद्ध होऊन त्यानंतर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय एनजीओ कडून पुढील वर्षी या कार्यास मदत होऊ शकते. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रयासचे कमल बागडी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
निळोण्याची साठवण क्षमता तीन लाख मीटरने वाढविण्याचे उद्दिष्ट
By admin | Updated: April 27, 2016 02:38 IST