नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील भाग : तालुका निर्मिती संघर्ष समितीची मागणीकेशोरी : अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी परिसर नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, जंगलव्याप्त, डोंगराळ, आदिवासी व मागासलेला भाग म्हणून प्रसिद्ध आहे. या भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केशोरीला तालुका निर्माण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय या भागाचा विकास होऊ शकणार नाही. यासाठी परिसरातील ग्रामपंचायतींसह तालुका निर्मिती संघर्ष समितीचे कार्यकर्ता योगेश नाकाडे, गुणवंत पेशने, प्रकाश वलथरे यांनी केशोरी तालुका घोषित करावा, अशा मागणीचे निवेदन शासनाकडे सादर केले आहे.केशोरी व परिसरातून अर्जुनी-मोरगाव तालुक्याचे अंतर ५० किमीपेक्षा अधिक असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना तालुक्याची कामे करण्यासाठी मोठाच त्रास सहन करावा लागतो. तसेच तालुक्याला ये-जा करण्यासाठी योग्य रस्ते व दळणवळणाची साधनेसुद्धा नाहीत. १६ वर्षांपूर्वी गोंदिया जिल्ह्याची निर्मिती झाली. तेव्हाही केशोरीला तालुका घोषित करण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी केली होती. परंतु त्यावेळी तत्कालीन शासनाने या मागणीची दखल घेतली नाही, ही मोठीच शोकांतिका म्हणावी लागेल. शासनाची ध्येयधोरणे व संकल्पनेनुसार राष्ट्राची प्रगती साधायची असेल तर पर्यायाने गावागावाची प्रगती साधायची असेल तर जिल्हे लहान, तालुके लहान झाल्याशिवाय ते शक्य नाही. शासन स्तरावरून नेहमीच अशी संकल्पना व्यक्त केली जाते.परंतु प्रत्यक्षात तशी कृती होत नाही, त्यामुळेच विकास होत नाही. अर्जुनी-मोरगाव तालुक्याच्या सीमेचा विचार केला तर विस्ताराने अर्जुनी-मोरगाव तालुका जिल्ह्यात सर्वात मोठा आहे. या तालुक्याच्या शेवटच्या टोकाचे अंतर ५० किमीच्या वर आहे. त्यामुळे केशोरी परिसर मूलभूत विकासापासून कोसो दूर जात असल्याचे चित्र दिसत आहे. केशोरी हे गाव या परिसरातील सर्वात मोठे गाव आहे. या ठिकाणी मिरची व धान्याची मोठी बाजारपेठ आहे. हा परिसर वनसंपदेने नटलेला आहे. यापासून औषध निर्मितीचे कारखाने निर्माण करून औद्योगिक विकास साधण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. या ठिकाणी सर्व विभागाचे शासकीय व निमशासकीय कार्यालये असून प्राथमिक शिक्षण ते पदवी शिक्षणापर्यंत सर्व माध्यमांची सोय आहे. येथून प्रतापगड, नवेगावबांध, तिबेटी कॅम्प, बंगाली कॅम्प व इटियाडोह जलाशयासारखी पर्यटन स्थळे जवळच आहेत. या सर्व बाबींचा विचार करून केशोरी तालुका निर्मितीसाठी शासनाशी संघर्ष करण्याची भूमिका स्पष्ट करीत केशोरी तालुका घोषित झालाच पाहिजे, या मागणीकरिता परिसरातील ग्रामपंचायतींसह केशोरी तालुका निर्मिती संघर्ष समितीचे कार्यकर्ते योगेश नाकाडे, गुणवंत पेशने, प्रकाश वलथरे यांनी निवेदन देवून शासनाकडे मागणी केली आहे. (वार्ताहर)
केशोरीला तालुक्याचा दर्जा द्या
By admin | Updated: October 10, 2015 02:23 IST