जवळा : आर्णी तालुक्यातील जवळा येथील गुरुदेव विद्या मंदिरातील आठव्या वर्गातील विद्यार्थिनीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सदर विद्यार्थिनी सोमवारपासून शाळेतून बेपत्ता होती. ममता ज्ञानेश्वर राठोड (१४) रा. किन्ही ता. आर्णी असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती जवळा येथील इंदिरा गांधी वसतिगृहात राहून शिक्षण घेत होती. सोमवारी दुपारी २ वाजता शाळेतून ती निघून गेली. रात्री वसतिगृहात आली नाही. त्यामुळे याच वसतिगृहात शिकत असलेली तिची लहान बहीण निशाने ही माहिती वडील ज्ञानेश्वर राठोड यांना दिली. वडिलांनी शाळेत जाऊन चौकशी केली. त्यावेळी शिक्षकांनी पोट दुखत असल्याचे कारण सांगून सोमवारी शाळेतून गेल्याचे सांगितले. सर्वत्र शोध घेतला असता कुठेही थांगपत्ता लागला नाही. यानंतर आर्णी पोलीस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार देण्यात आली. दरम्यान बुधवारी किन्ही शिवारातील कान्हेकर यांच्या शेतातील विहिरीत तिचे प्रेत तरंगताना आढळून आले. या घटनेची माहिती होताच अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. ममताने नेमकी आत्महत्या कोणत्या कारणाने केली हे मात्र कळू शकले नाही. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)
जवळा येथे आठवीतील विद्यार्थिनीची आत्महत्या
By admin | Updated: August 14, 2014 00:06 IST