ऑनलाइन लोकमत
अमरावती, दि. २६ - अमरावती जिल्ह्यातील बोरगाव धर्माळे या गावात १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर आठ जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलीचा प्रियकर पंकज गवई (वय २६ वर्ष) व त्याच्या तिघा मित्रांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून आणखी चौघा नराधमांचा शोध सुरु आहे.
अमरावतीजवळील रहाटगावात राहणारी १६ वर्षाच्या मुलीची शाळेत ये - जा करताना बोरगाव धर्माळे येथे राहणा-या पंकज गवईशी ओळख झाली व या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. काही दिवसांपूर्वी पंकजने शाळेत जाण्यासाठी निघालेल्या पिडीत मुलीला बळजबरी करत यवतमाळला नेले व तिथे मित्रांच्या साथीने तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यानंतर लागोपाठ दोन दिवस पंकज व त्याच्या मित्रांनी पिडीत मुलीला विविध ठिकाणी नेऊन तिच्या अत्याचार केले. बुधवारी पंकज व त्याचे मित्र पिडीत मुलीला घेऊन एसटी बसमधून गावी परतत होते. एसटी कर्मचा-याला या सर्वांवर संशय आला व त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. याप्रकरणी वडगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.