अपहरणप्रकरण : आरोपींची धक्कादायक कबुली सुरेंद्र राऊत यवतमाळविकासाचे दावे करणाऱ्या मध्य प्रदेशात उपवर मुलींची संख्या घटली. तेथील उपवर मुले आयुष्यभर अविवाहित राहण्याच्या भीतीने अखेर महाराष्ट्रातील मुली चक्क विकत घेत आहेत. पण हा सौदा सहजासहजी होत नाही. त्यासाठी स्थानिकांना हाताशी धरून गरिबांच्या मुलींचे अपहरण केले जाते. अशाच प्रकरणात दोन तरुणांना शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या कबुलीजबाबतून हे विदारक सामाजिक वास्तव पुढे आले आहे.‘स्थानिक समाजात लग्नासाठी मुलीच मिळत नाही. राज्याबाहेरून अपहरण करून आणलेल्या मुलींशी विवाह करण्याशिवाय पर्यायच नाही.’ अशी धक्कादायक कबुली अटकेतील तरुणांनी पोलिसांपुढे दिली. मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील तरणा येथील या तरुणांवर अपहरण, अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले आहेत. मनोज बन्सीला कसेरा (२३) आणि महेश गोविंद कसेरा (२५) अशी या आरोपींची नावे आहेत.या तरुणांनी यवतमाळातील दोघींचे अपहरण करून त्यांच्याशी लग्न केले. दोन्ही मुलींची कौटुंबिक पार्श्वभूमी अतिशय हालाखीची आहे. यातील एक तर तब्बल वर्षभरापासून घरी आली नाही. याबाबत तिच्या आईवडीलांनीसुद्धा साधी विचारपूस केली नाही. अशाही स्थितीत तिने बारावीपर्यंतचे शिक्षण घेऊन ब्यूटीपार्लरचा डिप्लोमा केला. सुतगिरणीत काम करतानाच तिची ओळख एका तरुणीशी झाली. या दोन्ही मुली एका मोठ्या टोळीची सदस्य असलेल्या महिलेच्या संपर्कात आल्या. याच महिलेने चार साथीदारांच्या मदतीने या दोघीेंचे अपहरण करून मनोज आणि महेशला विकल त्यानंतर विवाह केला. यातील महेश हा हलवाईचे (मिठाई बनवितो) काम करतो. तर मनोज गॅरेजमध्ये कामाला आहे. त्याने लग्न केलेली तरणी सहा महिन्यांची गर्भवती आहे. या दोघांनी कौटुंबिक जबाबदारी पूर्ण केल्याचेही पोलिसांना सांगितले. एकीची प्रकृती वारंवार बिघडत असल्याने तिचा चांगल्या डॉक्टरकडे उपचार सुरू असल्याचे महेशने सांगितले. या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल झाल्याने त्यांची सुटका होणे शक्य नाही. दरवर्षी गावात अशा पद्धतीच्या विवाहामुळे अनेक तरूणांना तुरूंगात जावे लागत असल्याचेही त्यांनी कबूल केले. सक्तीचे मातृत्वविवाहासाठी मुलीच मिळत नसल्याने मध्य प्रदेशात जातीपातीच्या भिंती केव्हाच कोसळल्या आहेत. तेथे थेट मुलगी विकत घेऊन लग्न लावले जाते. त्यानंतर ही मुलगी त्याच कुटुंबातील सदस्य बनून राहते. लग्नानंतर मुलगी पळून जाऊ नये म्हणून पहिल्याच वर्षी मूल होण्याचा आग्रह धरला जातो.
मुलगी विकत घेऊनच करावे लागते लग्न
By admin | Updated: January 17, 2017 01:17 IST