शेतकऱ्यांचे प्रश्न : तहसीलवर धडकणारघाटंजी : आज पिकांची परिस्थिती अतिशय खराब आहे. पावसाअभावी सोयाबीन जमिनदोस्त झाले. बोंडासह पऱ्हाटी जळून जात असल्याने कपाशीवरीलही उमेद संपली. त्यामुळे शेतकरी पुरता खचला आहे. शासन म्हणते, पीक उत्तम आहे. हीच स्थिती राहिली तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतील. या बाबी थांबविण्यासाठी १९ आॅक्टोबरला तहसीलवर चढाई मोर्चा काढला जाणार असल्याची माहिती मंचचे अध्यक्ष देवानंद पवार यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली. कालचे सत्तेतील लोक जलक्रांतीची भाषा करतात, लोअर पैनगंगेच्या गोष्टी करतात. हा प्रकल्प होईल तेव्हा होईल. पण, अस्तित्वात असलेल्या अरुणावती, वाघाडी, गोखी, चोरकुंड, जांब, झटाळा, घोटी, शिवणी, कोची आदी प्रकल्पाचे पाणी खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचते का? १४ टक्केही ओलीत या प्रकल्पांतून होत नाही, मग उपयोग काय, असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला. सत्तेत बसलेले लोक शेतकऱ्यांना मनोरुग्ण ठरवित असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. बळीराजा चेतना अभियान काढून उपदेश केल्याने शेतातील वाळणारे पीक थांबले का, कर्ज फिटेल का, असा प्रश्न करून शेतमालाला भाव, अद्यावत कृषी प्रशिक्षण केंद्राची निर्मिती, वीज बिल माफी करा. याच मागणीला घेऊन १९ आॅक्टोबरला मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांचे तालुकास्तरीय प्रश्न अनेक दिवसपर्यंत निकाली काढले जात नाही. चालढकल केली जात असल्याचे दिसून येते, असे त्यांनी सांगितले. यावेळी पंचायत समिती सभापती शैलेश चवरडोल, रफीक बाबू, संजय पाटील, बाबू चवरडोल उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
घाटंजीत लोकजागृती मंचचा चढाई मोर्चा
By admin | Updated: October 18, 2015 02:52 IST