यवतमाळ : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनने विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषदेसमोर घंटानाद आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पेमध्ये सुधारणा करावी, २००५ नंतर सेवेत नियुक्त सर्वच कर्मचाऱ्यांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी, अनुकंपा धोरणात आमूलाग्र बदल करावा, पाच दिवसांचा आठवडा सुरू करावा, सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वर्षे करावी, सातवा वेतन आयोग इतर राज्यांप्रमाणे त्वरित लागू करावा, वर्ग दोन आणि तिनची रिक्त पदे तातडीने भरावी, पंचायत समिती स्तरावर एमआरईजीएस आणि इंदिरा आवास योजनेकरिता स्वतंत्र सहायक लेखाधिकारी व कनिष्ठ लेखाधिकारी पद निर्माण करावे, एनआरएचएममध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांना टप्प्याटप्प्याने सेवेत सामावून घ्यावे, आदी २१ मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले. युनियनचे जिल्हाध्यक्ष संजय गावंडे, सरचिटणीस दिलीप कुडमेथे, कार्याध्यक्ष सुरेश चव्हाण यांच्या नेतृत्वात कर्मचाऱ्यांनी मधल्या सुटीत जिल्हा परिषदेसमोर घंटानाद केला. या आंदोलनाला जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांनी भेट देऊन मागण्यांना पाठींबा दिला. आंदोलनात संतोष मिश्रा, गजानन मडकाम, सरिता लंगोटे, रेखा धुर्वे, प्रमोदिनी रामटेके, मंजुषा बोरगमवार, अनिल कानतोडे, उत्तम बेजलवार, हरीश पंचगडे, प्रशांत चुंबळे, संदीप शिवरामवार आदींसह कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
जिल्हा परिषदेपुढे घंटानाद आंदोलन
By admin | Updated: December 28, 2016 00:24 IST