यवतमाळ : शासकीय तूर खरेदी सुरू करण्याच्या मागणीसाठी ‘प्रहार’तर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घुगरी’ आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यातील काही शासकीय तूर खरेदी केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे खुल्या बाजारात व्यापारी अल्प दराने तुरीची खरेदी करीत आहे. यात शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. जिल्ह्यातील शेतकरी हालदिल झाले आहे. त्यासाठी शासकीय तूर खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रहारतर्फे घुगरी आंदोलन करण्यात आले. खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. प्रथम त्यांनी जिल्हा कचेरीसमोरच दोन मोठ्या गंजात घुगरी शिजविली. ती रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना वाटण्यात आली. यात जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत काही कर्मचाऱ्यांनाही घुगरीचे वाटप करण्यात आले. यानंतर आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन सादर केले. या आंदोलनात नितीन महल्ले, हंसराज सोमवंशी, आशिष तुपटकर, तुषार भोयर, राहुल झाडे, स्वप्नील उजवणे, नीलेश मेश्राम, धीरज जयस्वाल, रवी राऊत, आकाश गावंडे आदी सहभागी झाले होते. (शहर प्रतिनिधी)
तूर खरेदीसाठी जिल्हा कचेरीसमोर ‘घुगरी’ आंदोलन
By admin | Updated: March 4, 2017 00:57 IST