ब्राह्मणगावातील प्रकार : ऐन उन्हाळ्यात पाण्याची नासाडी लोकमत न्यूज नेटवर्क उमरखेड : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतून खोदकाम करून ब्राह्मणगाव-चातारी रस्त्यावर जिओ कंपनीचा पाईप टाकताना संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या सहाय्याने खोदकाम केल्याने ऐन पाणीटंचाईच्या काळात ठिकठिकाणी पाणी पुरवठ्याची पाईप लाईन तसेच ग्रामपंचायतच्या मालकीचा सिमेंट रस्ता फोडला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. आधीच भारनियमनामुळे नागरिक त्रस्त असताना आता पाणीटंचाईचाही सामना करावा लागू शकतो. सध्या तालुक्यात जिओ कंपनीचे पाईप व वायर जमिनीतून टाकण्याचे काम सुरू आहे. काही दिवसांपूर्वी विडूळ येथे याच कंपनीच्या ठेकेदाराने रस्त्याची साईड बर्म खोदून खोदकाम केल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांनी संबंधित ठेकेदाराविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने गुन्हा दाखल झाला आहे. आता पुन्हा एकदा जिओ कंपनीच्या ठेकेदाराने निष्काळजीपणे काम करून ब्राह्मणगावात पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनची व रस्त्याची तोडफोड चालविली आहे. पाणीपुरवठ्याची पाईप लाईनच फुटल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला आहे. शिवाय ग्रामपंचायतने बनविलेला सिमेंट रोडही फुटला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आधीच भारनियमनामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. जेसीबीच्या सहाय्याने जिओ कंपनीकडून ठेकेदार खोदकाम करीत आहे. यावेळी जबाबदार कोणीही अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होत असून याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. याची दखल वरिष्ठांनी घ्यावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
जिओ कंपनीने फोडली पाईपलाईन
By admin | Updated: May 11, 2017 01:11 IST