जिल्हा परिषद : काँग्रेस, राष्ट्रवादी सदस्यांकडे लक्ष, कृषी विभागाचा कारभार येणार चव्हाट्यावरयवतमाळ : उद्या बुधवारी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा वादळी ठरण्याचे संकेत मिळत आहे. या सभेत कृषी, समाजकल्याण, शिक्षण विभागावरून वादळ उठण्याची चिन्हे आहेत. विशेषत: कृषी विभागावरून राष्ट्रवादी आणि काँगे्रस सदस्यांमध्येच परस्परांत खटके उडण्याची शक्यता आहे.येत्या फेब्रुवारी-मार्चमध्ये जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे ही सर्वसाधारण सभा अखरेची ठरण्याची शक्यता आहे. तथापि निवडणूक कार्यक्रम उशिरा घोषित झाल्यास आणखी एक सर्वसाधारण सभा होऊ शकते. अशा स्थितीत पुढील सर्वसाधारण सभा डिसेंबरमध्ये होऊ शकते. मात्र तत्पूर्वीच निवडणूक घोषित झाल्यास आचारसंहिता लागून पुढील सभा बारगळण्याची शक्यता वाढू शकते. त्यामुळे उद्या बुधवारी होणारी सर्वसाधारण सभा अखेरची समजूनच सर्व सदस्य आपापले विषय मार्गी लावण्यासाठी धडपड करणार आहेत. सध्या जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या दोन पक्षांच्या मातब्बरांमध्येच वितुष्ट निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांचे काही पदाधिकारी आणि सदस्य परस्परविरोधी भूमिकेत दिसत आहे. विशेषत: कृषी विभागाच्या कारभारावरून या दोन पक्षांमधील पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये ‘दुही’ निर्माण झाली आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आणि सदस्य कृषी विभागाच्या कारभारावरून परस्परविरोधी भूमिका घेताना दिसत आहे. परिणामी बुधवारच्या सभेत याच विषयावरून या दोन पक्षांमध्ये खडाजंगी उडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कृषी विभागाच्या साहित्य खरेदीवरून गेले काही दिवस या दोन पक्षांतील मातब्बरांमध्ये वाद दिसून येत आहे. काही पदाधिकारी आणि सदस्य या प्रकरणावर पांघरूण घालण्यासाठी प्रयत्नरत आहेत. काही आजी व माजी पदाधिकारी हे प्रकरण धसास लावण्यासाठी जोर लावत आहे. या सोबतच समाजकल्याण विभागाची साहित्य खरेदीही सभेत गाजण्याची शक्यता आहे. समाजकल्याणच्या साहित्य खरेदीवरून अनेक सदस्य नाराज आहे. याशिवाय शिक्षण विभागातील बिंदुनामावली, समायोजन प्रक्रिया यावरूनही सभेत वादळी चर्चा होण्याचे संकेत प्राप्त होत आहे. या सर्वसाधारण सभेकडे संपूर्ण जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. (शहर प्रतिनिधी)सुटीच्या दिवशी कामकाजबुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेचा धसका प्रशासनानेही घेतला आहे. परिणामी मंगळवारी शासकीय सुटी असतानाही सामान्य प्रशासन विभाग आणि लेखा व वित्त विभागात कामकाज सुरू होते. या दोनही विभागात काही कर्मचारी आणि अधिकारी दुपारपर्यंत ठाण मांडून होते. खुद्द सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कक्ष अधिकाऱ्यांच्या खर्चीवर बसून काही फाईल चाळताना दिसत होते. उद्याची सभा वादळी होण्याचे संकेत मिळताच अधिकारी व कर्मचारीही सजग झाले. कदाचित ही शेवटचीच सभा ठरण्याची शक्यता असल्याने प्रशासनही ही सभा एकदाची शांततेत उरकविण्याच्या तयारीत दिसून येत आहे.
सर्वसाधारण सभा ठरणार वादळी
By admin | Updated: September 14, 2016 01:19 IST