शाळा बेफिकीर : रिक्षा, आॅटोरिक्षा, मिनीडोअर, टाटा मॅजिक, मारोती व्हॅनमधून वाहतूक अखिलेश अग्रवाल पुसदशहरात आधीच वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना आता शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा जीवघेणा खेळ सुरू आहे. रिक्षा, आॅटोरिक्षा, मिनीडोअर, टाटा मॅजिक आणि मारोती व्हॅनमधून नियमबाह्य वाहतूक केली जाते. शाळा मात्र स्कूल बस खरेदीस टाळाटाळ करीत असल्याने विद्यार्थी घरी येईपर्यंत पालकांचा जीव टांगणीला लागलेला असतो. इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे पेव फुटल्यानंतर विद्यार्थ्यांंना शाळेत नेण्यासाठी वाहनांचा उपयोग सुरू झाला. नियमानुसार विद्यार्थ्यांना स्कूल बसमधून शाळेत नेणे आणि आणणे आवश्यक आहे. मात्र पुसद शहरात नियमांचे उल्लंघन करीत खासगी वाहनातून प्रवास घडविला जातो. सुरक्षित नसलेल्या आॅटोरिक्षा, टाटा मॅजिक, गॅसवर चालणाऱ्या मारोती व्हॅनमधून विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक सुरू असते. आॅटोरिक्षात तर क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी बसविले जातात. पाच विद्यार्थी क्षमता असलेल्या आॅटोरिक्षात आठ ते दहा विद्यार्थी बसलेले दिसतात. अनेक विद्यार्थी तर चालकाच्या बाजूला उभे असतात. आॅटोरिक्षा चालकांना विचारले तर कमी विद्यार्थी नेणे परवडत नसल्याचे कारण सांगितले जाते. शहरात टाटा मॅजिक वाहनातूनही सध्या मुलांची ने-आण सुरू आहे. स्कूल बस असे यावर लिहिले असले तरी परिवहन विभागाच्या नियमाचा बोजवारा उडालेला दिसतो. अनेक शाळांमध्ये गॅसवर चालणाऱ्या मारोती व्हॅनमधून विद्यार्थ्यांची वाहतूक केली जाते. अत्यंत धोकादायक पद्धतीने विद्यार्थी त्यामध्ये बसलेले असतात. तसेच चालक प्रशिक्षित आहे की नाही याकडेही कुणाचे लक्ष नसते. वाहतूक पोलीसही मुलांना शाळेत जायला वेळ होईल म्हणून अशा वाहनांना अडवायला तयार नसतात. याच संधीचा फायदा घेत पुसद शहरात विद्यार्थ्यांची जीवघेणी वाहतूक सुरू आहे.
पुसदमध्ये विद्यार्थ्यांच्या वाहतुकीचा जीवघेणा खेळ
By admin | Updated: July 13, 2015 00:18 IST