अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पहाटे चार वाजता जागणे, झुंजुमूंजूतच काठी टेकवत टेकवत ‘मॉर्निंग वॉक’ करणे, मग दातवनाने दात घासणे, नियमित १० वाजताच जेवण करणे, दुपारी नातवांशी गप्पा अन् रात्री ११ वाजता न चुकता शांत झोपी जाणे... ही दिनचर्या आहे १०५ वर्षांच्या वत्सलाबाई नवसुजी एकनार नावाच्या शतायुषी आजीची. शेगावच्या गजानन महाराजांचा प्रत्यक्ष आशीर्वाद लाभलेल्या या आजी आजही दर गुरुवारी पूर्ण दिवस उपवास पाळतात. ‘परमेस्वरावर भरोसा ठेवला न् नातवायचे मुखं पाहाले भेटले तं कोनाले मरा लागते गा?’ जीवनावरच्या या श्रद्धेमुळेच आजी आजही ठणठणीत आहे.यवतमाळ तालुक्यात कार्ली गावात ही आजी राहते. सुरकुत्यांनी सजलेला चेहरा. मान किंचित थरथरते. पण नजर तेज. शंभर वर्षांहून अधिक काळ पाहिलेल्या वत्सलाबार्इंच्या मनात आठवणींचा खजिना आहे. ‘लोकमत’शी बोलताना संत गजानन महाराजांच्या भेटीचा क्षण ओठांवर आला. ‘द्वारका पाह्यली. तिन्ही देवं पाहून आली. पन गजानन बाबावानी खुशी कुठीसा नाई...’संत गजानन महाराजांची भेट कशी झाली, हा किस्सा सांगताना वत्सलाबाईच्या शब्दांमध्ये धार चढली. नाथपंथी असलेला एकनार परिवार गुरं घेऊन गावोगावी भटकंती करायचा. एखाद्या शेतात गुरं बसवून तिथेच पाल ठोकून राहायचे. महिलांनी शेतात मजुरी करायची. अशा भटकंतीत हा परिवार शेगावच्या आसपास पोहोचला. वत्सलाबाईला खूप दिवसांपासून ‘तिजारं’ आलं होतं. तिजारं म्हणजे ताप, सर्दी, खोकला. हे तिजारं काही केल्या कमी होईना. जडीबुटी खाऊनही उपयोग झाला नाही. ‘मंग माह्या भासरा मने का एकडाव गजानन बाबाच्या पाया पड’ गजानन महाराजांच्या भेटीची इच्छा असलेली वत्सलाबाई शेतात मजुरी करीत असताना गलका झाला..‘अवं माय गजानन बाबा चाल्ले ना इथूनस..’ झालं. साºया बाया वावरातून तडक रस्त्यावर येऊन उभ्या राहिल्या. गजानन महाराजांच्या पायावर त्यांनी डोके टेकविले. महाराजांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला, डोक्यावर हात ठेवला, डोक्याचे केस तिच्याच तोंडात घातले अन् म्हणाले, ‘जा आता’! १०५ वर्षांच्या वत्सलाबाई ही घटना सांगताना आवर्जुन म्हणाली, मी आज बी गुरुवारी गजानन बाबाचा उपास धरते.नाम साहेबराव, घर मे चिंध्या चिंध्याब्रिटिश काळ पाहिलेल्या वत्सलाईबाई म्हणतात, ‘कोण राजा हाये आमाले घेनं देनं नोह्यतं.’ त्यांचे पती भावड्या आणि दीर साहेबराव व कुशा त्यांच्या गावच्या परिसरात खूप परिचित होते. त्यामुळे इंग्रज सरकारमधील काही कर्मचारी पैसे उकळण्याच्या उद्देशाने मुद्दाम त्यांना पाहण्यासाठी आले. तर त्यांची गरिबी पाहून ते अवाक् झाले अन् रागाने म्हणाले, ‘नाम साहेबराव और घर मे चिंध्या चिंध्या!’ हे वाक्य काही काळासाठी गावात एखाद्या वाक्प्रचारासारखे वापरले जाई, अशी आठवणही वत्सलाबाईने हसून सांगितली.जुन्या काळची नोटाबंदीतवाचा काळ लई सोपा व्हता. दोन आण्याले पायलीभर जवारी भेटे. जुन्या काळाचा आताच्या काळाशी संबंध जोडताना वत्सलाबाईने एक मजेशीर आठवण सांगितली. तवा बी नोटाबंदी झाल्ती. दूध ईकल्यावर माह्याकडं पैसे राहे. एक आणा गिना सबन डाबाराचे पैसे राहे. पन मंग थे पैसे काहूका तं बंद झाले न् साहेब लोकं मंग कागदायचे पैसे देये. माह्याकडचे डाबराचे पैसे बदलवाले मले मंग येवतमाळले नाई तं आर्णीले जा लागे. डाबराचे द्याचे नं कागदाचे आनाचे असं होये तवा...’५० सदस्यांचे गोकूळवत्सलाबार्इंचे कोणतेही समवयस्क आज हयात नाही. तीन मुलं, तीन मुली, तीन सुना, आठ नातू, आठ नातसुना, २५ पणतू अशा ५० जणांच्या कुटुंबाची वत्सलाबाई प्रमुख आहे. तिच्या नावावर १४ एकर जमीन आहे. नातसुनांच्या कामावर अजूनही बारीक लक्ष.
गजाननबाबांचा आशीर्वाद अन् १०५ व्या वर्षीही उपवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 22:13 IST
पहाटे चार वाजता जागणे, झुंजुमूंजूतच काठी टेकवत टेकवत ‘मॉर्निंग वॉक’ करणे, मग दातवनाने दात घासणे, नियमित १० वाजताच जेवण करणे, .....
गजाननबाबांचा आशीर्वाद अन् १०५ व्या वर्षीही उपवास
ठळक मुद्देशतायुषी वत्सलाबार्इं : सकाळी पायपीट, दुपारी गप्पा अन् नियमित झोप