यवतमाळ : जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या दलित वस्ती योजनेत आर्णी तालुक्यामध्ये अनियमितता झाली आहे. या शिवाय समाजकल्याणच्या साहित्य खरेदी रखडली आहे. या प्रमुख मुद्यांवर सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने समाजकल्याण समितीची बैठक चांगलीच गाजली. दलित वस्तीसाठी बारा कोटी रुपये मंजूर झाले आहे. या बाबत ५ डिसेंबर रोजी काम वाटपासंदर्भात बैठक घेतली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र दलित वस्तीचा मुद्दा चर्चेला येताच समिती सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. आर्णी पंचायत समितीतील काही गावांमध्ये चक्क दलित वस्तीची कामेही वस्तीबाहेर करण्यात आल्याची तक्रार सदस्य सोनबा मंगाम यांनी केली. बऱ्याचदा दलित वस्तीच्या कामात स्थानिक जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेतले जात नाही. कुठलीही माहिती दिली जात नाही. या बाबत संगीता इंगोले आणि उषा राठोड यांनी आक्षेप घेत संबंधित ग्रामसेवकांवर कारवाईची मागणी केली. २०१२-१३ या आर्थिक वर्षात मंजूर झालेली कामे करण्यात आली नाही. आता ही कामे रद्द करून नवीन कामे मंजूर केली जावी, असाही ठराव समितीत घेण्यात आला. सेस फंडातून वैयक्तिक लाभसाठी साहित्य खरेदी केली जाते. यात भजन साहित्य, धान्य कोठ्या, टिनपत्रे, शिलाई मशीन आदी वस्तूंचा समावेश असतो. मात्र गेल्या वर्षीपासून ही खरेदी प्रक्रियाच पूर्ण करण्यात आलेली नाही. शासनाच्या नवीन अध्यादेशाप्रमाणे आर्थिक वर्षात तरतूद केलेल्या रकमेपैकी केवळ १५ टक्के रक्कम मार्च महिन्यात खर्च करता येणार आहे. ही अडचण लक्षात घेऊन साहित्य खरेदीचे त्वरित नियोजन करावे, अशी ही मागणी सदस्यांनी समाजकल्याण समितीच्या बैठकीत केली. यावेळी सभापती लता खांदवे यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)
दलित वस्ती मुद्यावरून गाजली बैठक
By admin | Updated: November 26, 2014 23:13 IST