किशोर वंजारी नेरतालुक्यातील ११५ गावांमधील गावठाणाची नोंद भूमी अभिलेख विभागाकडे नसल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. मागील ५० वर्षांपासून सर्वेक्षणच झाले नसल्याने शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात बुडत आहे. ग्रामपंचायतीचेही वेळकाढू धोरण याबाबीला तेवढेच जबाबदार असल्याचे सांगितले जाते. नेर तालुक्यात १२१ गावांचा समावेश आहे. यात ५१ ग्रामपंचायती आणि एक नगरपरिषदेचा समावेश आहे. शेतकरी, प्लॉटधारक, घरपट्टे, ले-आऊटधारक यांचा संबंध भूमी अभिलेख कार्यालयाशी येतो. मात्र या कार्यालयात सुरू असलेला भोंगळ कारभार त्यांच्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. या मागील कारणही आता स्पष्ट झाले आहे. महसूल प्रशासन आणि ग्रामपंचायतींनी गावठाणाच्या नोंदी भूमी अभिलेख विभागात करण्याची तसदीच घेतली नाही. भूमी अभिलेख विभागानेही कधी यासाठी प्रयत्न केले नाही. गावठाणाच्या नोंदी नसल्यामुळे भूमी अभिलेख विभाग भूखंडाची मोजणी करू शकत नाही. नेर नगरपरिषद क्षेत्रात ले-आऊटचे प्रस्थ वाढले आहे. ले-आऊटमालक महागड्या किमतीत प्लॉट विकून मोकळे होतात. प्लॉटधारकांना मात्र काही अडचणी आल्यास मोजणी करता येत नाही. कारण या भूखंडाची नोंद भूमी अभिलेख विभागातच नसल्याची बाब पुढे येते. भूखंड मोजणीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे वादाचे प्रकारही घडत आहे. शेतशेजारी, घरशेजारी यांच्यात थोड्या थोड्या जागेवरून खटके उडतात. वास्तविक नोंद करण्याची जबाबदारी ग्रामपंचायत आणि महसूल विभागाची आहे. परंतु या दोनही घटकांनी घोंगडे झटकण्याचाच प्रयत्न केला आहे. याचा त्रास मात्र सर्वसामान्य लोकांना होत आहे. प्लॉटधारकांनी विकलेल्या प्लॉटची मोजणी करायची कशी, हा प्रश्न आता प्लॉट मालकापुढे निर्माण झाला आहे. मागील ५० वर्षांपासूनच्या नोंदी नसतानाही भूमी अभिलेख विभागाने मात्र याकडे सातत्याने कानाडोळा केला जात आहे. याचा त्रास मात्र नागरिकांना सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
गावठाणाच्या नोंदी बेपत्ता
By admin | Updated: August 31, 2015 02:21 IST