‘मेडिकल’चा कारभार : आदेशाची पायमल्ली यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवेचा डोलारा सांभाळणाऱ्या नर्सेसच अडचणीत सापडल्या आहेत. मेट्रनच्या मनमानी कारभारमुळे नर्सेसमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. मर्जीतील कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्यासाठी इतरांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप नर्सेस असोसिएशनने केला आहे. मेट्रन आॅफिसमध्ये प्रशासकीय कामकाजासाठी दोन सहायक मेट्रन आहेत. शिवाय लिपिकही देण्यात आला आहे. याउपरही रुग्ण सेवेतील महत्वाचा घटक असलेल्या नर्सेसला कार्यालयीन कामाकाजात गुंतवून ठेवले जाते. अशा प्रकारे नर्सला नॉन क्लिनिकल कामात गुंतवू नये, असे आदेश वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकाने दिले आहेत. या आदेशाची राजरोसपणे पायमल्ली केली जात आहे. मर्जीतील नर्सेसला कमी जोखमीची कामे दिली जातात. काहींना तर केवळ कार्यालयीन कामाकाजासाठीच वापरले जात आहे. नर्सेसमध्ये फुुट पाडून त्याच्यावर अन्याय करण्याचा प्रकार सुरू आहे. याबाबत तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही होत नाही, त्यामुळे नर्सेस असोसिएशनने मेट्रनच्या कारभाराविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. अध्यक्ष शोभा खडसे आणि कोषाध्यक्ष सविता राऊत यांनी अधिष्ठातांकडे तक्रार केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
मेट्रनच्या मनमानीने परिचारिकांमध्ये रोष
By admin | Updated: February 25, 2016 02:25 IST