यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याचे खंदे समर्थक भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या पार्थिवावर रविवार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अमरावती मार्गावरील पिंपरी-लासीना येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. जांबुवंतराव धोटे यांचे शनिवारी पहाटे हृदयघाताने यवतमाळच्या शासकीय रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच संपूर्ण यवतमाळ शहरासह विदर्भावर शोककळा पसरली. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी शनिवारी अग्रवाल ले-आऊट स्थित निवासस्थानी ठेवण्यात आले होते. दिवसभर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. रविवारी सकाळी १० वाजता त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे. शहरातील विविध मार्गावरून मार्गक्रमण करीत ही अंत्ययात्रा अमरावती मार्गावरील पिंपरी-लासीना येथील त्यांच्या शेतात पोहोचेल. त्या ठिकाणी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. भाऊ जांबुवंतराव धोटे यांच्या निधनाचे वृत्त कळताच विदर्भातील सामाजिक, राजकीय, कला आदी क्षेत्रातील अनेकांनी यवतमाळकडे धाव घेतली. त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. त्यांच्या निधनामुळे शहरातील नेताजी चौक परिसरातील सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. तसेच त्यांचे निवासस्थान असलेल्या वाघापूर रोड परिसरातील सर्व प्रतिष्ठाने बंद होती.
जांबुवंतराव धोटे यांच्या पार्थिवावर आज पिंपरी येथे अंत्यसंस्कार
By admin | Updated: February 19, 2017 00:34 IST