१६ व १७ मार्च : समारोपाच्या अध्यक्षस्थानी श्रीपाल सबनीस, कार्यक्रमांची रेलचेलयवतमाळ : पहिले राज्यस्तरीय फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन घाटंजी तालुक्यातील माणुसदरी येथे १६ व १७ मार्च रोजी आयोजित केले असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांनी पत्रपरिषदेत दिली. पवार म्हणाले, या संमेलनातील सर्व कार्यक्रम केवळ शेती व शेतकऱ्यांशी निगडीत असतील. लोकजागृती मंच, पंचायत समिती घाटंजी व शांतीदूत बुद्धविहार समिती माणूसदरी यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन आयोजित केले आहे. आदिवासी बहुल माणुसदरी गावात वसंतराव नाईक साहित्यनगरी वसविण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन बुधवार, १६ मार्च रोजी दुपारी चार वाजता ३३ व्या अस्मितादर्श साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. रविचंद्र हडसनकर (नांदेड) यांच्या हस्ते होईल. संमेलनाध्यक्ष म्हणून मोतीराम कटरे (मुंबई) हे राहतील. सायंकाळी सात वाजता ‘शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना’ या विषयावर वऱ्हाडी कवी मिर्झा रफी अहमद बेग यांचा मिर्झा एक्सप्रेस हा कार्यक्रम होईल. गुरुवार, १७ मार्च रोजी लोकशाहीर नागोराव गुरनुले यांचे शेतकरी प्रबोधन गीते सकाळी १० वाजता राहील. सकाळी ११ वाजता ‘शेतकऱ्यांचे प्रश्न आणि फुले आंबेडकरी विचार’ या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी प्रा. माधव सरकुंडे राहतील. दुपारी एक वाजता शालेय मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम व दुपारी दोन वाजता कविसंमेलन होईल. अध्यक्षस्थानी बळी खैरे राहतील. सायंकाळी पाच वाजता समारोपीय कार्यक्रम होईल. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस, पुणे हे राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार राजू तोडसाम, अॅड. अनिल किलोर, अण्णासाहेब पारवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, पत्रकार न. मा. जोशी, सुरेश शहापूरकर, श्रमिक पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष नागेश गोरख, तहसीलदार एम.एम. जोरवर, डॉ. निरंजन मसराम, संजय पालतेवार आदींची उपस्थिती राहील. सायंकाळी सत्यपाल महाराज यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती जिल्हा परिषद सदस्य देवांनद पवार यांनी पत्रपरिषदेत दिली. (प्रतिनिधी)
फुले-आंबेडकरी कृषी साहित्य संमेलन
By admin | Updated: March 10, 2016 03:18 IST