निवडणूक तारखांची प्रतीक्षा : भाजपाच्या तीन आमदारांची कसोटी, काँग्रेसमध्ये सामसूमयवतमाळ : जिल्ह्यातील नवनिर्मित सहा नगर पंचायतींच्या होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी राजकीय मोर्चेबांधणी चालविली आहे. त्यात भाजपाच्या पाच पैकी तीन आमदारांची चांगलीच कसोटी लागणार आहे. जिल्ह्यातील बाभूळगाव, कळंब, राळेगाव, मारेगाव, झरी आणि महागाव या सहा ग्रामपंचायतींना शासनाने नगरपंचायतींचा दर्जा दिला आहे. तेथे आता नगरसेवक पदासाठी निवडणुका घेतल्या जातील. या नगरपंचायतींचे नेमके वार्ड किती, त्यात समाविष्ट होणारे क्षेत्र कोणते, त्याचे आरक्षण, मतदार यादी, त्यावरील आक्षेपानंतर सुनावणी व त्रुटींची पूर्तता आणि अंतिम मतदार यादी आदी प्रक्रिया पार पडली आहे. आता प्रत्यक्ष निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे. हा निवडणूक कार्यक्रम पुढील महिन्यात लागू केला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. वार्डनिहाय मतदार याद्या जाहीर झाल्याने सहाही नगरपंचायतींमध्ये राजकीय मोर्चेबांधणीला चांगलाच वेग आला आहे. राजकीय पक्षांचे नेतेच नव्हे तर गल्लीबोळातील कार्यकर्तेही नगरपंचायत निवडणुकीसाठी तयारीला लागले आहेत. प्रा.डॉ. अशोक उईके, संजीवरेड्डी बोदकुरवार आणि राजेंद्र नजरधने या भाजपाच्या तीन आमदारांच्या मतदारसंघात या सहा नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे तेथे भाजपाचे वर्चस्व मिळवून देण्याच्या दृष्टीने या तीनही आमदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. इकडे उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांनी फिल्डींग लावली आहे. ते जनतेच्या त्याच प्रमाणे आमदारांच्याही संपर्कात आहेत. शिवसेनेने महागावची जबाबदारी माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांच्याकडे सोपविली आहे. अन्य ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व उपजिल्हा प्रमुख नगरपंचायती खेचून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्नरत आहेत. या निवडणुकीबाबत काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये तेवढा इन्टरेस्ट पहायला मिळत नाही. जिल्हास्तरावर त्याची सूत्रे असण्याऐवजी नगरपंचायत कार्यक्षेत्रातील मोठ्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविली गेल्याचे सांगण्यात येते. अशीच स्थिती काँग्रेसचीसुद्धा आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वत:हूनच पुढाकार घेत नगरपंचायतीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. पक्षस्तरावरून त्यासाठी एबी फॉर्म देण्याचे अधिकार कुणाला आहेत, नेमके कोण हे फॉर्म देतील याबाबत काँग्रेसमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. सहा नगरपंचायतींची पहिलीच निवडणूक असल्याने नियम व अधिकाराबाबत सर्वत्रच संभ्रमाची स्थिती पहायला मिळते. नगरपंचायत निवडणूक लढविण्यासाठी अनेक गावपुढारी तयारी करीत आहे. त्यातूनच त्यांनी थेट यवतमाळ मुख्यालयापर्यंत व पक्ष कार्यालयात येरझारा वाढविल्या आहेत. नेतेही त्यांना ‘कामाला लागा’ असा सल्ला देताना दिसत आहे. भाजपा व शिवसेनेने नगरपंचायतीच्या या निवडणुका गांभीर्याने घेतल्या आहेत. त्यासाठी नेते व पदाधिकारी तयारी करीत आहे. त्या तुलनेत काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये नगरपंचायत निवडणुकीबाबत अद्यापही मरगळ पहायला मिळत आहे. जिल्हाध्यक्ष कायम आहे का, कार्यकारिणी कायम आहे का, तालुका पदाधिकारी जुनेच आहेत का, एबी फॉर्म कोण देणार अशा विविध मुद्यांवर काँग्रेसमध्ये संभ्रम पहायला मिळतो आहे. (जिल्हा प्रतिनिधी)वणीत बेसावधपणा भोवला वणी तालुक्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या इंदिरा सहकारी सूत गिरणी निवडणुकीत भाजपाचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी चांगले यश मिळविले होते. अनेक वर्षांच्या काँग्रेसच्या ताब्यातील ही गिरणी हिसकावली होती. मात्र तोच कसब त्यांना अध्यक्ष-सचिव निवडीत दाखविता आला नाही. मुळात ते बेसावध राहिले आणि त्यांच्या गटातील सदस्य काँग्रेसने पळवून नेले. अधिक जागा मिळवूनही या सूत गिरणीत भाजपाचा अध्यक्षपदासाठी पराभव झाला. नगरपंचायत निवडणुकीतही भाजपाला प्रचंड सतर्क राहावे लागणार आहे. कारण तेथेसुद्धा असाच गेम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. झरीबाबत मार्गदर्शन मागितलेसहा पैकी झरी ही सर्वात कमी अर्थात १७४० लोकसंख्या असलेली एकमेव नगरपंचायत आहे. त्यातही तेथील मतदारांची संख्या सुमारे ११०० एवढी आहे. नगरपंचायत सदस्यांच्या जागा मात्र १७ आहेत. ते पाहता अवघ्या ७० ते ८० मतांमध्ये नगरपंचायतीचा सदस्य निवडणूक येऊ शकतो. हा पेच सोडविण्यासाठीच निवडणूक विभागाने थेट राज्याच्या निवडणूक प्रमुखांकडे या नगरपंचायतीबाबत मार्गदर्शन मागितले आहे. या झरी नगरपंचायतीमध्ये लगतच्या जामणी ग्रामपंचायतीचा समावेश करावा, त्यामुळे मतदार संख्या वाढेल व नंतर निवडणुका घ्याव्या, अशी मागणी करण्यात आली आहे. शासनाने अद्याप त्यावर निर्णय दिलेला नाही.
सहा नगरपंचायतींसाठी मोर्चेबांधणी
By admin | Updated: September 27, 2015 01:54 IST