यवतमाळ : केरोसीनचा कमी केलेला ५० टक्के कोटा तसेच एपीएल, केसरी कार्डधारकांना धान्य मिळावे आणि रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवानाधारकांना मानधन मिळावे आदी मागण्यांसाठी नागरिकांनी किरकोळ केरोसीन विक्रेता व रास्ता भाव दुकानदार संघटनेच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. रास्त भाव दुकानदार व केरोसीन परवानाधारक प्रामाणिकपणे ग्राहकांची सेवा करीत असताना शासनाने ५० टक्के केरोसीनचा कोटा कमी केला आहे. म्हणजेच एका कार्डवर एक लिटर तर दारव्हा येथे २०० मिली असे केरोसीनचे वाटप केले जात आहे. यवतमाळ जिल्हा हा आदिवासीबहुल जिल्हा असून शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे. याची शासनाला जाणिव असतानाही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप नागरिकांनी केला. उल्लेखनीय म्हणजे महाराष्ट्रात यवतमाळ जिल्ह्यातच केरोसीनचा कोटा कमी आहे. रॉकेलचा कोटा कमी करणे, अर्ध्या कार्डधारकास धान्य न देणे, एपीएल व केसरी कार्डधारकांना आठ महिन्यापासून धान्य देणेच बंद करणे यामुळे ग्राहक शासनाच्याविरोधात गेले आहे. त्यामुळे परवानाधारक व रास्तभाव दुकानदारांना प्रत्येक कार्डाला चार लिटर रॉकेल, केसरी कार्डाला २० किलो गहू, पाच किलो तांदूळ देण्यात यावा, तसेच केरोसीनचा कोटा पूर्ववत करण्यात यावा म्हणजे कार्डधारकांना व्यवस्थित पुरवठा करता येईल. दुय्यम व नवीन रेशनकार्ड प्रमाणपत्र जास्तीत जास्त १५ दिवसात मिळावे, ग्राहकांची प्रत्येक तक्रारीची नोंद शासनाने नोंदवहीत करावी आणि दलालांवर आळा घालावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.शासनाने ग्राहक व रास्त भाव विक्रेत्यांच्या या मागण्यांची त्वरित दखल न घेतल्यास संपूर्ण कार्डधारक ग्राहक, केरोसीन परवानाधारक व रास्त भाव दुकानदार तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. या आंदोलनात किरकोळ केरोसीन विक्रेते, रास्त भाव दुकानदार संघटनेचे अरुण जोग, शिवा आडे, शकील पटेल, कैलास ढोके, दीपक डगवार, बालाजी ठाकरे, राजू धलवार, मुकेश जगताप, संजय एंबरवार, मुसाभाई, शेख शम्मी आदींसह असंख्य नागरिक सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
केरोसीन व धान्यासाठी मोर्चा
By admin | Updated: January 27, 2015 23:41 IST