यवतमाळ : नॉन क्रिमिलेअरची ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी यांना लागू करण्यात आलेली अट तत्काळ रद्द करावी, या मागणीसाठी आज ओबीसी, एसबीसी, व्हीजेएनटी आंदोलन फ्रन्टच्यावतीने येथील सामाजिक न्याय भवनावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चेकऱ्यांनी या भवनात ठिय्या दिला असून मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. येथील आझाद मैदानातून निघालेला हा मोर्चा शहरातील विविध भागात मार्गक्रमण करीत न्याय भवनावर धडकला. या मोर्चात महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्व विजाभज हक्क कृती समितीचे जिल्हाध्यक्ष देवानंद पवार, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य उपाध्यक्ष माधुरी अराठे, विदर्भ ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गोबरे, तेली समाज संघटनेचे अध्यक्ष उत्तम गुल्हाने, वसंतराव नाईक अधिकारी, कर्मचारी संघटनेचे प्रांताध्यक्ष अमर मराठे, महाराष्ट्र लोक आयोगाच्या महिला अध्यक्ष वर्षा निकम, महाराष्ट्र भोई समाज सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष हिंमत मोरे, ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष राजेश मुके, माळवी सोनार संघ सचिव अरुण पाचकवडे, नाभिक महामंडळाचे अध्यक्ष संजय मादेशवार यांनी केले. (शहर वार्ताहर)
नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करण्यासाठी मोर्चा
By admin | Updated: August 14, 2014 00:06 IST