लोकमत प्रेरणावाटशिवचरण हिंगमिरे : विडूळजीवनात यशाची पायरी चढण्यासाठी कठीण परिश्रमाची गरज असते. एकदा परिश्रमाची तयारी असली की कोणतीही बाब अशक्य नाही. त्याला हवी असते केवळ जिद्द आणि चिकाटी. अशाच चिकाटीतून उमरखेड तालुक्यातील धानोरा येथील एका तरुणाने फुलाच्या शेतीतून अर्थार्जनाचा मार्ग स्वीकारला. एवढेच नाही तर इतर बेरोजगार तरुणांपुढेही आदर्श ठेवला. प्रशांत जाधव असे या तरुणाचे नाव आहे. तीन हजार लोकसंख्या असलेल्या धानोरा साचलदेवचा तो रहिवासी. गावात रोजगाराची कोणतीच संधी नाही. शहराची वाट धरावी तर तेथेही थारा नाही. अशा स्थितीत २४ वर्षीय प्रशांतने चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर फुलांची शेती करण्याचा निर्धार केला. आई-वडील आणि भावंडांना सोबत घेवून त्याने शेती सुरू केली. आपल्या शेतात अवघ्या २० गुंठ्यात मोगरा, शेवंती, गलांडा, गुलाब, झेंडू, निशिगंधा, वॉटरलिली आदी फुलझांडांची लागवड केली. अगदी सहा महिन्यातच त्याच्या हाती उत्पन्न मिळू लागले. प्रशांतला रोजगार तर मिळालाच. परंतु इतरही तरुणांनाही या शेतीतून रोजगार मिळवून दिला. त्याच्या शेतातील फुले हदगाव, हिमायतनगर, महागाव, वाशिम, माहूर आदी परिसरात विकले जातात. आता तो फुलांच्या सजावटीकडेही वळला आहे. लग्न, वाढदिवस तथा विविध समारंभात प्रशांत कलात्मकतेने फुलांची सजावट करतो. शेतीसोबतच त्याचा हा जोडधंदा बहरून आला आहे. फुलाच्या शेतीने प्रशांतच्या जीवनात सुगंध निर्माण केला आहे. एक तरुण जिद्दीच्या जोरावर फुलाची शेती करतो. परंतु कृषी विभागाने मात्र याची दखलच घेतली नाही. त्याने यासाठी कोणतेही कर्ज अथवा योजनेचा लाभ घेतला नाही. भविष्यात त्याला कृषी विभागाची मदत हवी आहे. परंतु पुढाकार मात्र कुणीही घेत नाही.
फुलाच्या शेतीतून दळवळतोय श्रमाचा सुगंध
By admin | Updated: September 10, 2015 03:10 IST