लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा वेग बऱ्याच प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळेच मंगळवारी चार हजार अहवालांपैकी केवळ ७३ पाॅझिटिव्ह आले तर दिवसभरात तब्बल ३०१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकीकडे हे दिलासादायक चित्र असले तरी मंगळवारी चार जणांचा बळीही नोंदविला गेला. मंगळवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात यवतमाळ शहरातील ६० वर्षीय महिला, तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, दारव्हा शहरातील ६५ वर्षीय महिला आणि खासगी रुग्णालयात पांढरकवडा तालुक्यातील ८४ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. दिवसभरात ४९ पुरुष आणि २४ महिलांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. त्यात आर्णी ४, दारव्हा ४, दिग्रस ४, महागाव १, मारेगाव ६, नेर ५, पांढरकवडा १, पुसद ९, उमरखेड ३, वणी ९, यवतमाळ १४, झरी जामणी ११ व अन्य शहरातील दोन रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६ लाख २६ हजार ५७० नागरिकांच्या चाचण्या झाल्या. त्यापैकी पाच लाख ५२ हजार ९३३ अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली.
दिवसभरात चार हजारांवर अहवाल निगेटिव्ह - मंगळवारी ४२३३ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात १२५२ सक्रीय रुग्ण आहे. त्यापैकी ५७९ रुग्णालयात तर ६७३ गृहविलगीकरणात आहे. एकूण बाधितांची संख्या ७१ हजार ९९७ तर एकूण कोरोनामुक्त रुग्णसंख्या ६८ हजार ९७७ आहे. आतापर्यंत १७६८ जणांचा कोरोनाने बळी घेतला. सध्या जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी दर ११.४९ तर मृत्यू दर २.४६ आहे.