आरक्षण जाहीर : ‘कही खुशी, कही गम’, बाभूळगावात पेचयवतमाळ : जिल्ह्यातील १६ पंचायत समितींच्या सभापती पदांसाठी गुरूवारी काढण्यात आलेल्या आरक्षणाने ‘कही खुशी, कही गम’, अशी स्थिती निर्माण झाली आहे. मारेगाव, राळेगाव, उमरखेड व दिग्रसचे पद खुले राहिल्याने तेथील इच्छुकांना दिलासा मिळाला आहे.१६ पंचायत समिती सभापती पदांसाठी येथील बचत भवनात आरक्षण सोडत काढण्यात आली. जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंग, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांनी निशीका संजय राऊत व नचिकेत संजय राऊत या भावंडाच्या हाताने ईश्वरचिठ्ठीने आरक्षण जाहीर केले. त्यात मारेगाव, राळेगाव, दिग्रस आणि उमरखेडचे सभापतीपद खुले, तर पुसद आणि आर्णीचे पद नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने, या सहा ठिकाणच्या इच्छुकांना दिलासा मिळाला. या सहा ठिकाणी ओबीसी व खुल्या गटातील उमेदवारांना सभापतीची संधी मिळणार आहे.महागावचे सभापती पद अनुसूचित जातीसाठी, तर बाभूळगाव अनुसूचित जमाती महिला, यवतमाळ अनुसूचित जमाती, तर घाटंजी व कळंब अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव निघाले. नेर व वणी येथील सभापती पद नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित झाले. पुसद आणि आर्णीत मागास प्रवर्गासाठी आरक्षित आहे. झरी जामणी, केळापूर आणि दारव्हा येथील पद सामान्य महिलेसाठी आरक्षित झाले. राळेगाव, मारेगाव, दिग्रस, उमरखेड सर्वसाधारण आहे. या आरक्षणामुळे सहा पंचायत समित्या वगळता उर्वरित १० ठिकाणचे सभापती पद आरक्षित झाल्याने ‘कही खुशी, कही गम’, असे वातावरण निर्माण झाले. (शहर प्रतिनिधी)
चार पंचायत समित्यांचे सभापतीपद ‘ओपन’
By admin | Updated: January 20, 2017 02:59 IST