पुसद : नैसर्गिक संपदेने नटलेल्या पुसद तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भीती वाटायची. परंतु अलिकडे वृक्ष तोड आणि विविध कारणाने जंगल विरळ होत चालले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास काही दिवसातच पुसद तालुक्याचे वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही. पुसद तालुक्यातील खंडाळा, धुंदी, शेंबाळपिंपरी, मांडवा, माणिकडोह, धनसळ, शिळोणा, खैरखेडा, हनवतखेडा ही जंगले एकेकाळी घनदाट होती. सद्यस्थितीत ही जंगले नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. उंच डोगरावरून बघितले तर पुसद शहराच्या परिसरातील घनदाट वृक्षराजी पूर्वी दृष्टीस पडत असते. आज मात्र शहरातील वाढती वसाहत, वृक्षतोड, औद्योगिकीकरण आदींमुळे शहराचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला आहे. वृक्षतोडीमुळे पुसदच्या तापमानानेही विक्रम केले आहे. पुसद परिसरातील वनराईने नटलेल्या पर्वत रांगा आज उजाड झाल्या आहे. उरलेल्या वनस्पतीवरही कुऱ्हाड चालत आहे.डोंगराळ भागात राहणारे आदिवासी वृक्षाला देव मानून त्यांचे रक्षण करीत होते. वनउपजावर आपली गुजरान करीत होते. परंतु संयुक्त वन व्यवस्थापनाच्या नावाखाली आदिवासींच्या या परंपरागत वनउपजावरचा हक्क हिरावला गेला. परिणामी शतकानुशतके प्राणपणाने जंगल आणि वन्यजीवांचे रक्षण करण्याचा आदिवासींचा प्रश्न पुढे आला. त्यांनी जंगलाचे रक्षण करणे सोडून दिले. याच संधीचा फायदा तस्करांनी घेणे सुरू केले. स्थानिकांना हाताशी धरुन मराठवाड्यातील तस्कर पुसद तालुक्यातील जंगलात शिरतात. सागवानासह आडजात वृक्षाची तोड करतात. या वृक्षतोडीमुळे पुसद तालुक्यातील पर्जन्यमानात घट होत आहे. हीच परिस्थिती अशीच कायम राहिल्यास निसर्गाचा हा अनमोल ठेवा नष्ट होण्याची भीती आहे. वृक्षांचे जतन करण्यासाठी शासनाने नियम केले आहे. इतकेच नव्हे तर या नियमांची अंमलबजावणी योग्य तऱ्हेने व्हावी म्हणून वन विभागाची निर्मिती केली आहे. परंतु वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या जबाबदारीची जाणीवच दिसत नाही. पुसद परिसरातील वृक्षांची कत्तल अतिशय बेमालुमपणे सुरू आहे. या परिसरात मोजक्याच आरामशीन आहे. तेथे फक्त दाखविण्यासाठी परवानगीचे काही लाकडे कटाईसाठी ठेवली जातात. परंतु वृक्षांचा बळी घेऊन अवैधपणे आरामशीनवर कटाईचे प्रमाण कमी नाही. अगदी हजारो वृक्षांची कटाई काही आरामशीनवर केली जात आहे. वृक्षतोडीला आळा घालण्यासाठी वनविभागाला कोणतेच पाऊल उचलता येत नाही का असा प्रश्न नागरिक विचारत आहे. (तालुका प्रतिनिधी)
पुसदमधील जंगल झाले विरळ
By admin | Updated: May 6, 2015 01:52 IST