अपघाताची भीती : सुरक्षेच्या उपाययोजना बेदखलदेवानंद पुजारी फुलसावंगीमहागाव तालुक्यातील २५ ते ३० गावांना वीज पुरवठा करणारे फुलसावंगी येथील ३३ केव्ही फिडरचे ट्रान्सफार्मर सताड उघड्यावर आहे. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नाही. त्यामुळे एखादेवेळेस येथे भीषण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे ४० वर्षांपूर्वी वीज वितरणचे उपकेंद्र थाटण्यात आले. या उपकेंद्रांतर्गत फुलसावंगी, निंगनूर, राहूर, भवानी, कोरटा असे पाच फिडर आहे. या पाच फिडरवरून २५ ते ३० गावांना वीज पुरवठा केला जातो. या पाच फिडरसाठी ३३ केव्ही ट्रान्सफार्मर बसविण्यात आले. सुरक्षेसाठी या ट्रान्सफार्मरजवळ नियमित सुरक्षारक्षक असणे गरजेचा असतो. परंतु या ट्रान्सफार्मरला साधे तार कंपाऊंडही करण्यात आले नाही. त्यामुळे सताड उघडे असते. सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नसल्याने मोकाट जनावरे या भागात फिरत असतात. तसेच काही जुगारीही या परिसरात जुगार खेळतात. लहान मुले पतंग उडविण्याच्या नादात या भागात जातात. हा प्रकार तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी नित्याचा झाला आहे. आमचे कामधंदे सोडून ट्रान्सफार्मरची सुरक्षा करावी काय, असा सवाल ते करतात. अधिकाऱ्यांनीही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास भीषण अपघात होण्याची शक्यता आहे.
फुलसावंगीचे ट्रान्सफॉर्मर उघड्यावर
By admin | Updated: November 4, 2016 02:10 IST