पैनगंगा आटली : नदी तीरावरील ५५ गावांमध्ये पाणीटंचाईचे सावटअविनाश खंदारे उमरखेडतालुक्याची जीवनदायी पैनगंगा हिवाळ्यातच आटल्याने तालुक्यातील तब्बल पाच लाख टन ऊस वाळण्याची भीती निर्माण झाली आहे. इसापूरचे पाणी भेटत नसल्याने आणि सिंचनात भारनियमन अडथळा निर्माण करीत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. नदी तीरावरील ५५ गावांवर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.उमरखेड तालुक्यातील वसंत सहकारी साखर कारखान्या कार्यक्षेत्रातील शेतकरी पैनगंगेच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात उसाची लागवड करतात. यंदाही मोठ्या प्रमाणात ऊस लागवड करण्यात आली आहे. परंतु अद्यापपर्यंत कारखाना सुरू झाला नाही, तर दुसरीकडे पैनगंगा नदी आटली आहे. त्यामुळे नदीवर लावलेले मोटरपंप बंद करण्याची वेळ आली आहे. शेतात असलेल्या विहिरीवरून ओलित करावे तर वीज भारनियमनामुळे ओलित करणे शक्य होत नाही. दुसरीकडे इसापूर धरणाचे पाणी पैनगंगेच्या पात्रात सोडले जात नाही. पैनगंगा नदी तीरावरील भांबरखेडा, तिवरंग, झाडगाव, हातला, दिवट पिंपरी, पळशी, नागापूर, बारा, बेलखेड, संगम चिंचोली, मार्लेगाव, तिवडी, लिंबगव्हाण, टाकळी, चालगणी, लोहरा, साखरा, खरूस, दिघडी, कारखेड, देवसरी, उंचवडद, चातारी, बोरी, कोपरा, मानकेश्वर, गाजेगाव, सोईट, ढाणकी, विडूळ, सावळेश्वर, करंजी, भोजनगर, पिंपळगाव, जेवली आदी ५५ गावांतील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे. तसेच या गावातील नळयोजना पैनगंगेच्या भरोशावरच सुरू असते. मात्र यावर्षी पहिल्यांदाच पैनगंगा हिवाळ्यात आटल्याने नळयोजना प्रभावीत झाल्या आहे. जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
पाच लाख टन ऊस धोक्यात
By admin | Updated: December 10, 2015 02:43 IST