चालकाचा जीव वाचला : पित्याची तक्रार, तीव्रता दडपल्याचा आरोप यवतमाळ : दारव्हा रोडवरील पेट्रोल पंपानजीक एका इनोव्हा गाडीवर गोळीबार करून चालकाच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. प्रसंगावधान राखल्याने चालकाचा जीव वाचला. सदर चालकाच्या पित्याने तक्रार दिली असली तरी वडगाव रोड पोलिसांनी या प्रकरणात राजकीय दबावातून तीव्रता दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप निवेदनातून केला गेला आहे. अशोक गोविंद डोरसटवार (६३) रा. गुरुकृपानगरी वडगाव ता. यवतमाळ यांनी वडगाव रोड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे. या तक्रारीत आनंद गुप्ता, रोहित जाधव, तन्नू त्रिवेदी, अजय सोळंकी, जहीर शेख व इतर सहा जणांचा उल्लेख आहे. यातील एक पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. तक्रारकर्ते अशोक डोरसटवार यांचा मुलगा संतोष (२५) हा इनोव्हा (एम.एच.२९-एडी-४४८२) चालवितो. तो घाटंजी येथे लग्नाची ट्रीप घेऊन गेला होता. सोमवारी रात्री ११ वाजता दरम्यान यवतमाळात परतला. डिझेल भरण्यासाठी दारव्हा रोडवरील पेट्रोल पंपावर गेला असता आनंद गुप्ता व त्याच्या आठ ते दहा साथीदारांनी संतोषवर प्राणघातक हल्ला केला. त्यांनी वाहनावर गोळीबार केला. एक गोळी काच फुटून आरपार गेली. यावेळी संतोषला मारहाण करण्यात आली. त्याच्या गळ्यातील चेन हिसकावल्याचे तक्रारीत म्हटले आहे. प्रसंगावधान राखून संतोषने तेथून पळ काढला व लोहारातील एका घराच्या शौचालयात आश्रय घेतला. तेथून आपल्या मित्रांना घटनेची माहिती देण्यात आली. मित्रांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच संतोषचे वडील अशोक डोरसटवार यांनी रात्री १ वाजता वडगाव रोड पोलीस ठाणे गाठले. तेथे मात्र त्यांना एक तास ताटकळत ठेवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करताना फायरिंगचा उल्लेख टाळला. पोलिसांनी शस्त्र प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३/२५ तसेच खुनाचा प्रयत्न, दरोडा, दंगा या सारखे गुन्हे दाखल करणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात थातूरमातूर गुन्हे नोंदवून तीव्रता दडपण्याचा प्रयत्न केला, असा आरोप अशोक डोरसटवार यांनी ११ मे रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर केलेल्या निवेदनात केला आहे. पोलिसातील हे प्रकरण मागे घ्यावे म्हणून वडगाव रोड ठाण्यात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसमक्ष यवतमाळातील एका मद्यसम्राटाने धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करून मूळ फिर्यादीनुसार हल्लेखोरांवर गुन्हे नोंदविण्यात यावी, अशी मागणी डोरसटवार यांनी केली आहे. पोलीस पुत्राचा समावेश असल्याने पोलीस यंत्रणा या प्रकरणावर तीव्रता दडपून पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही केला गेला आहे. (प्रतिनिधी)
दारव्हा रोडवर गाडीवर गोळीबार
By admin | Updated: May 12, 2016 02:39 IST