पोलिसांचा निष्कर्ष : घुग्गुसच्या कोल माफियांना शस्त्र पुरवठा वणी : पोलिसांनी उघडकीस आणलेल्या अग्निशस्त्रांच्या व्यापाराचे वणी हेच मुख्य केंद्र असून यातील शस्त्र विक्रेत्यांचे नेटवर्क वरोरा-घुग्गुसपर्यंत विस्तारले असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या शस्त्र खरेदीमागे दहशतवादी अथवा नक्षलवादी कृत्याचा संबंध नसून केवळ व्यापार व विक्री एवढाच हेतू आत्तापर्यंतच्या तपासात पुढे आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. वणी पोलिसांच्या सतर्कतेने शस्त्राचा हा व्यापार उघड झाला. त्यात वेकोलि कर्मचाऱ्याच्या मुलाचा महत्त्वाचा सहभाग आढळून आला. जतींदर सिंग ऊर्फ कालू सज्जन सिंग रा. भालर हा या शस्त्र प्रकरणातील मास्टर मार्इंड आहे. त्याच्यावर शिरपूर पोलीस ठाण्यात शस्त्रासंबंधी यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहे. तो मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. वडिलांच्या नोकरीनिमित्ताने तो वणी तालुक्यात आला. मात्र येथे त्याने शस्त्राचा व्यापार सुरू केला. मध्यप्रदेशातील जिल्हा सागर आणि छिंदवाड्यातील शिरपुरी येथे जतिंदर सिंगचे हस्तक आहे. त्यांच्याकडून तो शस्त्रांची खरेदी करतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो या व्यापारात आहे. त्याच्या या व्यापाराचे वणी हे मुख्य केंद्र असले, तरी घुग्गुसमधील कोल माफियांना त्याने मोठ्या प्रमाणात शस्त्र पुरवठा केल्याचा पोलिसांचा संशय आहे. वरोरामध्येही त्याचे नेटवर्क आहे. विशेष असे जतिंदरला सर्वच अग्नी शस्त्राबाबत पुरेसे ज्ञान आहे. त्यामुळेच त्याने या शस्त्राच्या व्यापारात पाय रोवले आहे. कुणी कोळशातील वर्चस्वासाठी, कुणी गुन्हेगारी वर्तुळातील वर्चस्वासाठी तर कुणी शिकारीसाठी जतिंदरसिंगकडून धारदार व अग्नी शस्त्रांची खरेदी केली. वणी परिसर नक्षली कारवायांमधील घटकांचा रेस्ट झोन असल्याचे पोलीस व गुप्तचर यंत्रणा मानते. त्यामुळे शस्त्राचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नक्षली कारवायांसाठी तसेच दहशतवादी कृत्यांसाठी या शस्त्रांचा पुरवठा वणीमार्गे होत नाही ना, अशी शंका पोलिसांना आली होती. मात्र सखोल तपासात आत्तापर्यंत तरी या शस्त्रांचा नक्षली व दहशतवादी कृत्यांशी संबंध नसल्याचे आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही शस्त्रे खास करून गुन्हेगारी वर्तुळातील वर्चस्वासाठी वापरली गेल्याचे सांगितले जाते. यातील आरोपी अद्याप पोलीस कोठडीत आहे. पोलिसांनी त्यांना घेऊन मध्यप्रदेशातील सागर येथेही प्रत्यक्ष भेट दिली. मात्र तेथील मुख्य शस्त्र पुरवठादार पोलिसांच्या हाती लागला नाही. जतिंदरने मात्र वणी, घुग्गुस व वरोरातील अनेक गुन्हेगारी टोळ्यांना शस्त्र पुरवठा केल्याचे सांगितले जाते. पोलिसांचे हात या टोळ्यांपर्यंतही पोहोचणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)गुन्हेगारी पार्श्वभूमी तरीही जतिंदर सिंगला वेकोलिची आॅर्डर जतिंदरचे वडील वेकालिमध्ये नोकरीला होते. आता त्यांच्या जागेवर जतिंदरने नोकरीसाठी दावा केला आहे. त्याला नोकरीची आॅर्डर देण्याचे काम अंतिम टप्प्यात असतानाच त्याचा शस्त्र पुरवठ्यातील सहभाग उघड झाला. तो पोलीस कोठडीत आहे. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त झाली. ते पाहता त्याला आता वेकोलिमध्ये नोकरीची संधी मिळणार नाही, असे मानले जात होते. परंतु प्रत्यक्षात दोन दिवसापूर्वी जतिंदर सिंगची वेकोलितील नोकरीची आॅर्डर जारी झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. जतिंदर सिंग हा शस्त्राचा व्यापार करतो. गुन्हेगारी टोळ्यांना त्याने शस्त्रे विकली. नक्षली वा दहशतवादी कारवायांशी त्यांचा संबंध आढळून आला नाही. मात्र त्याने नेमकी कुणाकुणाला शस्त्रे विकली याचा सखोल तपास केला जाणार आहे. - माधव गिरीउपविभागीय पोलीस अधिकारी, वणी
अग्निशस्त्रांचे वणी मुख्य केंद्र
By admin | Updated: April 1, 2016 02:51 IST