कडक कारवाईअभावी शिरजोर : वर्षानुवर्षे रेती चोरणारे तेच ते महाभागराळेगाव : रेती चोरी प्रकरणात महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी चोरट्यावर कारवाई करतात, रेती चोर शासनाद्वारे वाढविण्यात आलेला भरमसाठ दंड भरून दरवेळी निश्चिंत होवून पुन्हा त्याच कामाला लागतात. वाहन जप्ती आणि इतर कठोर कारवाई केली गेली नसल्याने या चोरट्यांची हिम्मत वाढली असून ते शिरजोर झाले आहेत. गतवर्षीच्या रेती घाटांची मुदत ३० सप्टेंबरला संपली होती. गेल्या अडीच महिन्यात सोळाही घाटांवर चोरट्यांनी चांगलाच उच्छाद मांडला होता. अधिकाऱ्यांच्या सुट्या, दौरे, बाहेरगावच्या मिटींग, सण-उत्सव या काळाची खडान्खडा माहिती ठेवून रेती चोरट्यांनी वेळोवेळी भरपूर डाव साधला. अनेकवेळी चोरी करण्यात यशस्वी ठरलेल्या या चोरट्यांना एखादवेळी पकडले जावून दंड भरावा लागला. तरीही काही फरक पडत नाही, अशी निश्चिंत पद्धती अंगीकारली होती. तहसीलदार सुरेश कव्हळे, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, पटवारी आदी पथकातील सदस्यांनी वेळोवेळी मोहीम राबवून नोव्हेंबरमध्ये २१ वाहने पकडली. दोन लाख चार हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. १ ते ७ डिसेंबरपर्यंत ६५ हजार २८० रुपये दंड वसूल करण्यात आला. रविवारी रात्री पुन्हा सहा वाहने विविध घाटांवर पकडून ९५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये रेती चोरटे प्रशासनाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. यापेक्षा आणखी कडक कारवाईची आवश्यकता असल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्यासाठी असलेल्या भरारी पथकांची २४ तास असलेली नजर, रेतीघाट असलेल्या गावात स्थापन करण्यात आलेल्या ग्रामस्तरीय समित्या, रेती तस्करांवर वॉच ठेवण्यासाठी नेमलेले खासगी गुप्तहेर, गौण खनीज उत्खननासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेले व जाहीर केलेले कडक धोरण यासह वाहनचालक-वाहकाविरुद्ध कारवाई, पोलीस कारवाई, अवैध रेती साठवणूक करणाऱ्यांविरुद्ध झालेली कारवाई, वाढविण्यात आलेला भरमसाठ दंड, वाहन जप्ती आदी कठोर नियम, कायदे, इशारे आदींचा रेती चोरट्यांवर फारसा उपयोग या तालुक्यात झाला नसल्याचे दिसून येते. यावर्षी तालुक्यातील १६ पैकी मोजक्याच घाटांचा लिलाव केला जात असल्याची माहिती आहे. (तालुका प्रतिनिधी)
दंड भरून तस्कर निश्चिंत
By admin | Updated: December 19, 2015 02:31 IST