पात्र प्रदूषित : कोळसा खाणीतून विदर्भा नदीत सोडले जात होते रसायनयुक्त पाणीवणी : तालुक्यातील घोन्सा येथून बारमाही वाहणाऱ्या विदर्भा नदीच्या पात्रात लगतच असलेल्या कुंभारखणी येथील भूमिगत कोळसा खाणीतील दूषित पाणी सोडण्यात येत होते. याबाबत १६ नोव्हेंबर रोजी ‘वणी तालुक्यातील विदर्भा नदीचे खोरे झाले विषाक्त’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच वेकोलिने दूषित पाणी पुरवठा करणे बंद केले आहे.घोन्साजवळून वाहणाऱ्या विदर्भा नदीच्या पात्रात लगतच्या कुंभारखणी भूमिगत कोळसा खाणीतून निघणारे रसायनयुक्त व दूषित पाणी सोडण्यात येत होते. याबाबत वारंवार ग्रामपंचायतीने वेकोलि प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र त्याची वेकोलितर्फे दखलच घेण्यात आली नाही. त्यामुळे नदी काठावरील गावांना दूषित पाणी प्राशन करावे लागत होते. नदीत सोडण्यात येणाऱ्या या पाण्यामुळे संपूर्ण नदी काळीभोर दिसू लागली होती.या नदीतील पाणी घोन्सा येथे नळाद्वारे सोडण्यात येत होते. त्यामुळे गावकऱ्यांचा आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला होता. गावकऱ्यांचे लक्ष जावू नये म्हणून वेकोलितर्फे रात्रीच्या वेळेला दूषित पाणी सोडण्यात येत होते. गेल्या तीन वर्षांपूर्वीही वेकोलिने अशाच प्रकारे दूषित पाणी सोडणे सुरू केले होते. तेव्हा ग्रामस्थांच्या तक्रारीवरून या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. मात्र आता पुन्हा वेकोलिने हेच दूषित पाणी सोडणे सुरू केल्यामुळे अख्या गावाचे आरोग्य धोक्यात सापडले होते.याबाबत ‘लोकमत’ने बुधवारच्या अंकात वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्तामुळे वेकोलि प्रशासनात चांगलीच खळबळ माजली व लगेच वृत्ताची दखल घेऊन वेकोलिमधून सोडण्यात येणाऱ्या दूषित पाण्याचा पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे आता नदीला जीवनदा मिळण्याची शक्यता आहे. खाणीतून सोडण्यात येणारे हे पाणी वेकोलिने फिल्टर करून सोडावे, अशी मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
अखेर दूषित पाणी पुरवठा झाला बंद
By admin | Updated: November 19, 2016 01:32 IST