पुसद : यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. निलय नाईक यांनी अखेर गुरुवारी भाजपात प्रवेश घेतला. मुंबई येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.गेल्या काही दिवसांपासून अॅड. निलय नाईक भाजपात प्रवेश करणार अशी चर्चा होती. दोन दिवसापूर्वी त्यांचे दोन खंदे समर्थक नीळकंठ पाटील आणि राष्ट्रवादीचे नगरसेवक नीरज पवार यांनी भाजपात प्रवेश घेतला होता. त्यामुळे अॅड. निलय नाईकही लवकरच भाजपात जाणार अशा चर्चेला जोर आला होता. अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. अॅड. निलय नाईक यांनी सुधाकरराव नाईक यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक लढविली होती. मनोहरराव नाईक यांच्या विरोधात ही निवडणूक लढविल्याने तेव्हापासून राजकीय तेढ निर्माण झाले होते. त्यावेळी निलय नाईकांना राष्ट्रवादी पक्षातून डच्चू दिला होता. त्यानंतर काही वर्षानंतर पुन्हा राष्ट्रवादीत प्रवेश केला. परंतु १५ वर्षांपासून राजकीय अस्तित्व दिसत नव्हते. त्यांच्या समर्थकांनाही कुठे वाव नव्हता. अखेर अॅड. नाईक यांनी भाजपात प्रवेश केला. (तालुका प्रतिनिधी)
निलय नाईकांचा अखेर भाजपा प्रवेश
By admin | Updated: October 28, 2016 02:06 IST