ज्ञानेश्वर मुंदे - यवतमाळ
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात भाग्य आजमावित असलेल्या ११ अपक्ष उमेदवारांच्या मतांची बेरीज केवळ अडीच टक्के आहे. त्यांनी २६ हजार ७७२ मते मिळविली आहे. कोणताही अपक्ष उमेदवार या निवडणुकीत प्रभाव पाडू शकला नाही. तर पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढलेल्या १३ उमेदवारांच्या मतांची टक्केवारी १३.४१ आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात २६ उमेदवार रिंगणात होते. त्यात पक्षाचे १५ तर अपक्ष ११ उमेदवारांचा समावेश आहे. दहा लाख ३३ हजार ४०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्या शिवसेनेच्या खासदार भावना गवळी चार लाख ७७ हजार ९०५ मते घेऊन विजयी झाल्या. तर काँग्रेसचे शिवाजीराव मोघे तीन लाख ८४ हजार ८९ मते घेऊन पराभूत झाले. या दोघांच्या एकत्र मतांची बेरीज केली तर ती ८३.४१ टक्के होते. यावरून या मतदारसंघात सरळ लढत झाली, असे म्हणायला वाव आहे. इतर कोणताही उमेदवार या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडू शकला नाही. अपक्ष ११ उमेदवारांंना तर केवळ अडीच टक्के मिळाली. यात सुरेश मुखमाले यांना २१३० मते, प्रशांत सुर्वे १५५८, उपेंद्र पाटील ८९५, प्रकाश राऊत २५१४, उल्हास जाधव ७१६६, रमेश गुरनुले २४८४, शेख जब्बार शे.युनुस २१७२, ज्ञानेश्वर मेश्राम १०३६, नरेश गुघाने ३४२२, विनोद चव्हाण २१७७, शामकुमार लोखंडे १२१८ मते मिळाली. बसपा, आप, मनसे, भारिप-बमसं, भाकप, फॉरवर्ड ब्लॉक, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, वेलफेअर पार्टी, बहुजनमुक्ती पार्टी, समाजवादी पार्टी, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, आरपीआय, लोकशासन या पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरविले होते. या सर्व उमेदवारांना एकत्रित एक लाख ३८ हजार ६०० मते मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी १३.४१ आहे. पक्षाचे उमेदवारही या निवडणुकीत आपला फारसा प्रभाव दाखवू शकले नाही. विशेष म्हणजे नकाराधिकार वापरणारे पाच हजार ५८३ मतदारांनी २६ पैकी कुण्याही एका उमेदवाराला पसंत केले नाही. झालेल्या मतदानाच्या अर्ध्या टक्के नकाराधिकाराचा वापर करणारी मते आहे. उमेदवारी दाखल करताना मोठ्या आत्मविश्वासाने मतांचे गणित मांडणार्या अपक्ष आणि पक्षांच्याही उमेदवाराला मतदारांनी त्यांची जागा दाखविल्याचे दिसून येत आहे.