दिग्रस विधानसभा : आता बळीचा बकरा कुणाला बनविणार ?मुकेश इंगोले - दारव्हादिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या नेटवर्कपुढे आपला टिकाव लागणार नाही याची जाणीव झाल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे आणि त्यांचे पूत्र राहुल ठाकरे यांनी या मतदारसंघातून माघार घेतली आहे. आता या मतदारसंघात कुणाला तरी काँग्रेसची उमेदवारी देऊन बळीचा बकरा बनविले जाणार एवढे निश्चित.गेल्या १५ वर्षांपासून दिग्रस-दारव्हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात आहे. हा मतदारसंघ काँग्रेसकडे खेचून आणण्यासाठी स्वत: प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी निवडणूक रिंगणात उतरावे, अशी या मतदारसंघातील काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांची मागणी आहे. कारण याच मतदारसंघाने ठाकरे यांना आमदार, मंत्री बनविले आहे. त्यांनी आपला बहुतांश विकास निधी याच मतदारसंघावर खर्ची घातला आहे. त्यांचे चिरंजीव राहुल यांनीही आपल्या जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात दिग्रस-दारव्हा मतदारसंघच विकासाचे टार्गेट ठेवले होते. विविध मार्गाने या मतदारसंघासाठी त्यांनी निधी खेचून आणला. माणिकरावांचा हा परंपरागत मतदारसंघ असल्यानेच त्यांनी अथवा मुलाने दिग्रसमधून निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. ही भावना रविवारी या मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीत त्यांनी बोलूनही दाखविली. परंतु शिवसेनेचा संपर्क पाहता ठाकरे पिता-पुत्रांनी तेथून माघार घेतली. प्रदेशाध्यक्ष असल्याने पक्ष आपल्याला निवडणूक लढण्याची परवानगी देणार नाही, असा बचाव माणिकरावांनी घेतला. तर राहुल ठाकरे यांनी दिग्रसला नाकारुन यवतमाळातून लढण्याची तयारी दर्शविली. आपला परंपरागत मतदारसंघ सोडून राहुल ठाकरे यवतमाळकडे धाव घेत असल्याने या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे. वास्तविक ठाकरे पिता-पुत्राने सन २००९ पासून यवतमाळ मतदारसंघावर आपली नजर फिरविली आहे. गेल्या वेळीही माणिकरावांनी अखेरपर्यंत स्वत:साठी प्रयत्न चालविले होते. मात्र अखेरच्या क्षणी नीलेश पारवेकर यांचे नाव निश्चित झाले आणि ते २० हजारांवर मतांच्या आघाडीने विजयीही झाले.दरम्यान त्यांच्या अपघाती निधनाने नंदिनी पारवेकर यांच्यावर निवडणूक रिंगणात उतरण्याची वेळ आली. त्यांनीही नीलेश पारवेकरांनी केलेली कामे आणि सहानुभूतीची लाट या बळावर १६ हजार मतांनी विजय मिळविला. आगामी विधानसभा निवडणुकीसाठीही नंदिनी पारवेकर याच प्रबळ दावेदार आहेत. मात्र राजकीय गोटात मुंबईपर्यंत त्यांच्याबाबत अपप्रचार केला जात आहे. मुलाच्या स्वार्थापायी प्रदेशाध्यक्षच नंदिनी पारवेकरांचे तिकीट कापण्याचा प्रयत्न करीत असल्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची भावना आहे. या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे पिता-पूत्राविरुद्ध रोषही पहायला मिळतो आहे. जिल्ह्यातील पाच पैकी चार आमदारांना पक्ष पुन्हा तिकीट देणार आहे. अनेक वर्षांपासून त्याच त्या चेहऱ्यांना काँग्रेस उमेदवारी देत आले आहे. असे असताना दीड वर्षांपूर्वी आमदार झालेल्या नंदिनी पारवेकरांचे तिकीट कोणत्या आधारावर कापणार, असा सवाल पक्षातच कार्यकर्ते उपस्थित करित आहेत. दिग्रस मतदारसंघ काँग्रेसचाच म्हणून ओळखला जात असताना ठाकरे पिता-पुत्राने आपल्या या परंपरागत मतदारसंघाकडे पाठ फिरविल्याने कार्यकर्ते नाराज आहेत. या मतदारसंघातील दोन नगरपरिषदांवर काँग्रेसची सत्ता आहे. राहुल ठाकरेंचे जिल्हा परिषद सर्कल याच मतदारसंघात आहे. त्यामुळे राहुल ठाकरेंनी दिग्रसमधूनच निवडणूक लढवावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. राहुल ठाकरेंनी यवतमाळसाठी आग्रह धरला असला तरी मुळात यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील जनता बाहेरील उमेदवारांना स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाही. तसा उमेदवार आल्यास त्याला धडा शिकविण्याचा निर्धार मतदार बोलून दाखवित आहे.
पिता-पुत्राची माघार
By admin | Updated: August 12, 2014 23:59 IST