वणी : भालर वसाहतीतील नथ्थू भोंगळे (५५) हे मुलाच्या लग्नपत्रिका वाटून गावाकडे परत जात असताना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात ते जागीच ठार झाले. ही घटना वणी-चंद्रपूर मार्गावरील एका हॉटेलसमोर मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. तालुक्यातील भालर वसाहतीतील नथ्थू भोंगळे यांच्या मुलाचे १५ दिवसानंतर लग्न होते. त्यासाठी मंगळवारी ते ड्युटी करून वणीकडे पत्रिका वाटण्यासाठी आले होते. लग्नपत्रिका वाटून झाल्यानंतर सायंकाळी ७ वाजता वणी-चंद्रपूर मार्गाने ते जात होते. एका हॉटेलसमोर अचानक त्यांचा दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर लगेच त्यांना येथील ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी भास्कर भोंगळे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात वाहन चालकाविरूद्ध भादंवि २७९, ३०४ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. येत्या १५ दिवसांनी त्यांच्या मुलाचे लग्न होते. मात्र मुलाच्या लग्नापूर्वीच पित्याचा मृत्यू झाल्याने लग्नाच्या आनंदावर विरजण पडले आहे. बुधवारी भालर येथील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (प्रतिनिधी)
मुलाच्या लग्नपत्रिका वाटताना पिता ठार
By admin | Updated: April 7, 2016 02:37 IST