तक्रार नोंदवा : कर्मचारी सावकारी करीत असल्यास कारवाई यवतमाळ : अवैध सावकार तारण म्हणून शेतकऱ्यांकडून शेतजमिनी लिहून घेतात. कालांतराने या जमिनी आपल्या नावे करून घेत असल्याचे आढळून आले आहे. अवैध सावकारीत एखाद्या सावकाराने अशाप्रकारची जमीन हडपली असल्यास ती जमीन शेतकऱ्यांना परत देण्याची तरतूद सावकारी कायद्यात आहे. त्यामुळे फसवणूक झालेल्या अशा शेतकऱ्यांनी सहकार विभाग किंवा थेट जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवन येथे मंगळवारी अवैध सावकारीबाबत प्राप्त तक्रारींचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हे आवाहन केले. बैठकीला अपर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.के.ए.डोळे, जिल्हा उपनिबंधक जितेंद्र कंडारे यांच्यासह सर्व तालुक्यातील सहकारचे सहाय्यक निबंधक उपस्थित होते.शासनाने अवैध सावकारीवर प्रतिबंध घातला आहे. असे सावकार शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर व्याजाची वसुली करून त्यांची फसवणूक करतात. तसेच त्यांनी तारण म्हणून ठेवलेल्या वस्तुंसह शेतजमीनी हडप करीत असल्याचे अनेक प्रकार जिल्ह्यासह राज्यात उघडकीस आले आहेत. जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून अशा सावकारांनी शेतजमीनी खरेदी करून घेतल्या असल्यास त्या जमीनी शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याबाबत चर्चा झाली. महाराष्ट्र सावकारी अधिनियमामध्ये अशा जमिनी सावकारी व्यवहारात खरेदी करून घेतल्या असल्यास सदर जमिनी शेतकऱ्यांना परत मिळवून देण्याची स्पष्ट तरतूद आहे. विशेष म्हणजे गेल्या १५ वर्षातील झालेल्या व्यवहारांचाही यात समावेश आहे. त्यामुळे यादरम्यान एखाद्या सावकाराने शेतकऱ्याची जमीन घेतली असल्यास संबंधीत शेतकऱ्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या सहकार विभागाच्या सहाय्यक निबंधक, जिल्हास्तरावर उपनिबंधक किंवा थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.महसूल भवन येथे झालेल्या बैठकीत गावपातळीवर काही शासकीय कर्मचारीही अवैध सावकारीचा व्यवसाय करीत असल्याची बाब मांडण्यात आली. कर्मचाऱ्यांकडून अशी सावकारी आढळून आल्यास सहकार कायद्यातील तरतुदीप्रमाणे कडक कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. (प्रतिनिधी)शोध व जप्ती मोहीमसहकार कायद्यान्वये सावकारीच्या सहायक निबंधकांना तक्रार प्राप्त झाल्यास थेट संबंधित सावकाराची झडती घेऊन दस्तऐवज ताब्यात घेण्याची तरतूद आहे. त्यामुळे तक्रारी प्राप्त झाल्यास तातडीने कार्यवाही केली जावी. तसेच अवैध सावकारीबाबत शोध व जप्ती मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या. तसेच दर १५ दिवसांतून अवैध सावकारीबाबत प्राप्त तक्रारींचा आढावा घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सबंधितांना केल्या.
बळकावलेल्या शेतजमिनी शेतकऱ्यांना परत मिळणार
By admin | Updated: July 1, 2015 00:23 IST