कांँग्रेसमध्ये दोन गट पडण्याची चिन्हे : राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना व पाटील गट येणार एकत्रआर्णी : दारव्हा तालुक्यातील बोरी सूत गिरणीच्या विजयाने काँग्रेसमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. पण आर्णीतील शेतकरी सहकारी जिनिंग प्रेसिंगच्या निवडणुकीची चाहुल लागताच वेगळीच रणनीती आखली जात आहे. तालुक्यापुरते का होई ना, काँग्रेसमध्ये दोन गट पडण्याची शक्यता दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वीच खरेदी विक्री संघाची निवडणूक आटोपली. त्यात एकमताने काँग्रेस व शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी युतीला मतदार सामोरे गेले होते. पण जिनिंग प्रेसिंगमध्ये मात्र काँग्रेसमध्येच दोन गट पडण्याची शक्यता उघड उघड दिसू लागली आहे. खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत खास करून दादा गट नाराज झाला होता. अध्यक्षपद जवळा सर्कलला मिळावे, ही मागणी अॅड.मोघे गटाने धुडकावून लावत लोणबेहळ सर्कलला ती संधी देण्यात आली. हाच कळीचा मुद्दा हेरून उत्तमरावदादा गटाचे कार्यकर्ते आपली नाराजी व्यक्त करीत मनीष पाटील यांना पुढे करून वेगळे अस्तित्व आजमावण्याच्या तयारीला लागले आहे. अर्थात खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मनीष पाटील यांना समोर करूनच काँग्रेसला यश मिळाले असल्याचा कांगावा केला जात आहे. परिणामी मनीष पाटील यांनी आपली वेगळी चूल मांडण्याचे नियोजनसुद्धा सुरू केल्याचे दिसते. अगदी दोन दिवसांपूर्वीच स्व.दादांच्या चहाते मंडळींना घेऊन मनीष पाटील यांनी जिनिंगच्या निवडणुकीसाठी काय केले पाहिजे, यावर माहेर मंगल कार्यालयात चिंतन केले. अॅड.मोघेपासून दूर होवू पाहणारा पाटील गट काँग्रेसमधील दुफळीला कारणीभूत ठरण्याची शक्यता आहे. पाटील गटाचा असा पवित्रा विरोधकांनीसुद्धा हेरला असून या गटाशी हातमिळवणी करण्यासाठी तयार असल्याचे कळते. तसे पाहता खरेदी विक्री संघाची आर्थिक परिस्थिती जशी आहे तशीच जिनिंग प्रेसिंगचीसुद्धा आहे. मध्यवस्तीत असलेली नऊ एकर जागा असून तीसुद्धा बँकेच्या कर्जासाठी लिलावात काढली होती. खरेदी विक्रीचे व्यवहारसुद्धा झाले. परंतु जिनिंग प्रेसिंगची जागा माहूर संस्थानची असल्याचा ऐतिहासिक पुरावा असल्याने संस्थेने न्यायालयात मागितली आहे. सदर जागेचे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. तरी काँग्रेसच्या काळात या जागेचे खरेदी विक्रीचे व्यवहार करण्यात आले. असे असतानाही जिनिंग प्रेसिंगवर आपलाच ताबा असावा, यासाठी राजकीय खलबते सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
शेतकरी जिनिंग निवडणुकीचे पडघम
By admin | Updated: April 2, 2016 03:03 IST