यवतमाळ : यवतमाळ पंचायत समितीच्या विस्तार अधिकाऱ्याला जिल्हाधिकारी कार्यालयात शिवसेना उपजिल्हा प्रमुखासह तिघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी दुपारी ३.३० वाजता घडली. या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा परिषद सदस्याचा विकास निधी विश्वासात न घेता विस्तार अधिकारी हेमंत श्रीपतराव निवल यांनी धामणी गावाचा निधी परस्पर ब्राम्हणी गावाकडे वळविल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे ब्राम्हणी गाव यवतमाळ पंचायत समितीच्या अखत्यारीतच नाही. याबाबत विचारणा केली असता विस्तार अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत होता. दरम्यान बुधवारी याबाबत जाब विचारण्यासाठी शिवसेना जिल्हा उपप्रमुख संतोष ढवळे यांनी हेमंत निवल यांना जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविले. त्या ठिकाणी शाब्दीक वाद होऊन संतोष ढवळेसह मुकिंदा भगत रा. कार्ली, संतोष गदई रा. जोडमोहा या तिघांनी निवल यांना मारहाण केली. या प्रकाराने काही काळ तणाव सदृश परिस्थिती होती. यानंतर हेमंत निवल यांनी यवतमाळ शहर पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी संतोष ढवळे, मुकिंदा भगत, संतोष गदई यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणणे यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान विस्तार अधिकाऱ्याला घेऊन पोलिसांनी घटनास्थळ गाठले होते. (शहर वार्ताहर)कामबंद आंदोलन विस्तार अधिकारी हेमंत निवल यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी गुरुवारपासून यवतमाळ पंचायत समितीतील कर्मचारी कामबंद आंदोलन करणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व विस्तार अधिकारी यात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मारहाण झाली. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असून त्या फुटेजवरुन नेमका प्रकार काय घडला याची माहिती मिळणार आहे. नेमका प्रकार कसा घडला याचा शोध शहर पोलीस घेत आहे.
विस्तार अधिकाऱ्याला मारहाण
By admin | Updated: May 14, 2015 02:15 IST