तहसीलदारांची मध्यस्थी : सेंट्रल बँकेकडून फसवणूक प्रकरणपुसद : विविध कर्जाच्या नावाखाली सेंट्रल बँक शाखा पुसदकडून तालुक्यातील २८ शेतकऱ्यांची लाखो रुपयांनी फसवणूक करण्यात आली. मंजूर रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर चढविण्यात येऊन परस्पर हडप करण्यात आली आहे. त्यामुळे ८ मार्च महिला दिनापासून तहसील कार्यालयासमोर या सर्व शेतकऱ्यांनी कुटुंबासह उपोषण सुरू केले होते. तहसीलदारांच्या मध्यस्थीनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. तहसीलदार डॉ. संजय गरकल, शहरचे ठाणेदार अनिल कुरळकर यांनी शेतकरी व बँकेचे व्यवस्थापक यांच्यामध्ये मध्यस्थी घडवून आणल्यामुळे अखेर बुधवारी या उपोषणाची सांगता झाली. यामध्ये अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा पुढाकार घेतला होता. तहसीलदार डॉ.संजय गरकल यांनी अन्यायग्रस्त सर्व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे व येणाऱ्या हंगामासाठी अर्ज उपलब्ध करून देण्याचे आश्वासन शेतकऱ्यांना देण्यात आले. यावेळी सेंट्रल बँकेकडून शेतकऱ्यांना कोणतीही नोटीस देण्यात येणार नसल्याचे बँक व्यवस्थापकाकडून सांगण्यात आले. मात्र दिलेले आश्वासन पाळल्या न गेल्यास शेतकरी पुन्हा त्यांच्या कुटुंबियांसह उपोषणाला बसतील, असेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डॉ. राजीव बाबळे, भाऊ पलडवार तसेच भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शेतकऱ्यांच्या उपोषणाची सांगता
By admin | Updated: March 11, 2016 02:49 IST