बळीराजाला दिलासा : नेरमध्ये रबीच्या पेरणीची लगबगनेर : हवामानावर आधारित पीक विमा योजनेला ३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी ही मुदत ३१ आॅक्टोबरपर्यंत होती. दरम्यान, तालुक्यात रबीच्या पेरणीची लगबग सुरू आहे. विमा योजनेला मुदतवाढ मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी खरीप हंगाम लांबणीवर पडला. आवश्यक त्या वेळी पाऊस न झाल्याने अपेक्षित उत्पादन शेतकऱ्यांना झाले नाही. सोयाबीन कापणीइतकाही खर्च काही शेतकऱ्यांचा निघाला नाही. अखेरच्या क्षणी बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या शेतात जनावरे सोडली. आता त्यांनी रबी हंगामाची तयारी सुरू केली आहे. हवामानावर आधारित पीक विमा योजनेंतर्गत गहू, हरभरा पिकाची निवड केली जाते. दरवर्षी साधारणत: दिवाळीपूर्वी रबीतील गहू, हरभऱ्याची ५० टक्के पेरणी आटोपते. यावर्षी दिवाळी होवून १५ दिवस लोटल्यानंतरही रबी हंगामातील शेती मशागतीची कामे झालेली नाही. अनेक शेतकऱ्यांनी खरिपातील पिकाचीही कापणी केली नाही. तुरीचे पीक बहरण्यासाठी आवश्यक वातावरणही नाही. थंडीचा जोर अतिशय कमी आहे. ही सर्व परिस्थिती लक्षात घेता कृषी विभागाने पीक विमा योजनेला मुदतवाढ दिली आहे. राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित रबी हंगामातील हरभरा, गहू पिकासाठी ३० नोव्हेंबर ही अंतिम तारीख दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, अशी विनंती तालुका कृषी अधिकारी मनोहर झंझाळ यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
पीक विम्याला मुदतवाढ
By admin | Updated: November 15, 2014 22:54 IST