यवतमाळ : जिल्ह्यात १ नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत सत्ताधारी शिवसेना व भाजपाच्या आमदार, नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्याच वेळी युतीला चित करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांचीही कसोटी लागणार आहे. मारेगाव, झरी, राळेगाव, बाभूळगाव, कळंब व महागाव नगरपंचायतीसाठी १ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकारचा फायदा उठवित या नगरपंचायतीत आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न भाजपाच्या आमदारांकडून सुरू आहे. त्याच वेळी शिवसेनेनेही आपल्या लालदिव्याचा प्रकाशझोत मतदारांवर ठेवण्याची धडपड चालविली आहे. काँग्रेसची धुरा विधानसभेत पराभूत झालेल्या माजी आमदारांकडे आहे. विधानसभेत भाजपा व शिवसेनेची युती तुटली असली तरी बाभूळगाव नगरपंचायतीत हे दोनही पक्ष युतीने हातात हात घालून निवडणूक लढवित आहे. झरी तालुक्यात काँग्रेस व राष्ट्रवादीची युती झाली आहे. शिवसेनेकडून पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, भाजपाकडून तेथील आमदारांसह शेतकरी नेते पाशा पटेल, काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे स्टार प्रचारक आहेत. काही ठिकाणी त्यांच्या सभा झाल्या आहेत. राष्ट्रवादीकडून मनोहरराव नाईक, आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग हे स्टार प्रचारक ठरले आहेत. राळेगाव नगरपंचायतीमध्ये भाजपाची धुरा विद्यमान आमदार प्रा.डॉ. अशोक उईके सांभाळत आहेत. काँग्रेसचे स्टार प्रचारक प्रा.वसंत पुरके असले तरी स्थानिक पातळीवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अॅड. प्रफुल्ल मानकर व त्यांची टीम परिश्रम घेत आहे. येथे राष्ट्रवादीला चार जागांवर उमेदवार मिळाले नाही. प्रवीण देशमुख यांच्याकडे राळेगावची जबाबदारी आहे. शिवसेनेच्यावतीने भावना गवळी येऊन गेल्या आहेत. राळेगावात आमदार संदीप बाजोरिया, पालकमंत्री संजय राठोड यांच्या सभा होणार आहे. राळेगावच्या सेनेच्या बॅनरवर मात्र विश्वनाथ नेरुरकरांचा फोटो दिसून आला नाही. कळंब नगरपंचायतीची निवडणूक शिवसेनेने चांगलीच प्रतिष्ठेची केली आहे. तेथे आतापर्यंत संजय राठोड व भावना गवळी यांच्या तीन सभा झाल्या आहेत. भाजपाने पाशा पटेल यांची सभा घेतली. येथील भाजपाची धुरा आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. काँग्रेसची संपूर्ण जबाबदारी माजी आमदार प्रा.वसंत पुरके हे यशस्वीरीत्या सांभाळत आहे. येथे सेना व भाजपाला प्रत्येकी एका उमेदवाराची उणीव जाणवली. राष्ट्रवादी व सेनेत बंडखोर नाहीत. काँग्रेसमध्ये सर्वाधिक चार ते पाच बंडखोर असल्याचे सांगितले जाते. भाजपातही बंडखोरांची डोकेदुखी कायम आहे. बाभूळगाव नगरपंचायतीची जबाबदारीसुद्धा भाजपाने त्या भागातील आमदार प्रा.डॉ. अशोक उईके यांच्याकडेच सोपविली आहे. तेथे शिवसेनेसोबत युती करण्यात आमदार उईके यांनी यश मिळविले. मात्र युतीला दोन जागांवर उमेदवार उभे करता आले नाही. उईके यांनी सेनेला पाच जागा दिल्या असून दहा जागा स्वत: भाजपा लढत आहे. शिवसेनेने बाभूळगाव नगरपंचायतीवरसुद्धा लक्ष केंद्रीत केले आहे. संजय राठोड यांचे तेथेही सभा झाली. ही नगरपंचायतसुद्धा काँग्रेसने प्रा.वसंत पुरके यांच्याकडेच सोपविली आहे. बाभूळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस १६ जागांवर लढत असून त्याच्या प्रचाराची जबाबदारी आमदार संदीप बाजोरिया, आमदार ख्वाजा बेग आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव घारफळकर यांच्याकडे आहे. बाभूळगाव ग्रामपंचायतीवर गेल्या दहा वर्षांपासून काँग्रेसची सत्ता होती. मात्र ही सत्ता यावेळी नगरपंचायतीमध्ये उलथविण्याचा प्रयत्न भाजपा-सेना व राष्ट्रवादीकडून केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नगरपंचायत निवडणुकीत नेत्यांची कसोटी
By admin | Updated: October 28, 2015 02:47 IST