राळेगावातील पालकांचा प्रश्न : गणवेश खरेदीत होताहे लूट राळेगाव : ग्रामीण भागात असलेल्या इंग्रजी शाळेतील शैक्षणिक स्तर कसा आहे याची तपासणी शिक्षण विभागाकडून वेळोवेळी केल्या जात नाही. जिल्हा परिषदेत शिकणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांच्या दर्जावर प्रत्येक वेळी चर्चा होती. त्याची दखल घेतल्या जाते. तपासणी केल्या जाते. शैक्षणिक स्तर सुधारण्यासाठी प्रयत्न केल्या जातो. पण मोठे शिक्षण शुल्क दरवर्षी खासगी शिक्षण संस्थांच्या इंग्रजी शाळात भरुनही तेथील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर कसा आहे याची कधी चौकशी केली जात नाही. त्यावर कारवाई केल्या जात नाही. तेथील शैक्षणिक स्तर ढ कसा? तो उंचावण्यासाठी करावयाचे प्रयत्न आदीबाबत लक्ष देण्याऐवजी दुर्लक्ष केल्या जाते. इंग्रजी शाळा म्हणजे उत्कृष्टच ही पालकांची तयार झालेली मानसिकता. जोडीला अशा शाळेतील शैक्षणिक स्तराबाबतचे अज्ञान या बाबीपुढे संस्था चालकांची मनमानी मग्रुरी सोसली जाते. टाय, सूट, बुटमध्ये शाळेत जाणारे विद्यार्थी पालकांना स्मार्ट वाटतात. पण शिक्षण स्मार्ट होत आहे का याबाबत बहुतांश पालकांना माहितीही नसते. किमान वेतन कायद्यापेक्षाही कमी दरात वेठबिगारासारखे शिक्षकांना या शिक्षण संस्थांमध्ये कामावर लावले जाते. सहा-सहा महिने पगार दिल्या जात नाही. त्यानंतर शिक्षक नोकरी सोडून इतरत्र निघून जातात. रिक्त जागांवर अनेक महिने नवीन शिक्षक लावल्या जात नाही. यात एकीकडे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. तर दुसरीकडे शिक्षकांची पिळवणूक होते. सतराशे ते दोन हजार रुपयापर्यंत या गणवेश बाजारभावापेक्षा अधिक दराची पुस्तके, नोटबुक, शालेय साहित्य, स्कूल बसचे व्यापारी तत्वावरचे बसभाडे, यात पालकांना एकीकडे लुबाडण्यात येते. तर दुसरीकडे शासनाचे शॉप अॅक्ट, विक्रीकर आयकर आदी बुडविल्या जाते. त्यातच भरमसाठ शैक्षणिक शुल्क व साहित्याचे दर याची तक्रार करण्याची सोय ठेवल्या जात नाही. निवासी विद्यार्थ्यांच्या आहारासह अनेक समस्या वेगळ्या आहे. शाळा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या पालकांच्या समित्या या पालकाऐवजी शाळेलाच जास्त झुकते माप देतात. काही संस्थांना वाढीव इयत्तांना मंजुरात नसतानाही मागील काही वर्षात गडगंज कमाई करून घेतली होती. व शिक्षण विभाग अंधारात असल्याचा देखावा करीत या खासगी शाळांचे लांगून चालन करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण इंग्रजी शाळांत कधी होणार शिक्षण स्मार्ट ?
By admin | Updated: June 22, 2016 02:25 IST