यवतमाळ : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना घरगड्याप्रमाणे वागणूक देण्यात येत होती. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सलग नऊ महिन्यांपासून वेतन दिले नाही. उलट याच कर्मचाऱ्यांना खरेदीत भष्ट्राचार करण्यासाठी प्रवृत्त केले जात होते. यामुळे त्रस्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या संयमाचा बांध फुटल्याने त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमानंद निखाडे यांच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अधिनस्थ जिल्ह्यात १४ ग्रामीण रुग्णालय आहेत. याशिवाय आरोग्य विषयक अनेक महत्वपूर्ण उपक्रम याच कार्यालयाकडून राबविण्यात येतात. गेल्या काही वर्षांपासून या विभागाचा कारभार कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी मनमानी पध्दतीने या कर्मचाऱ्यांचा वापर करत आहेत. अकरा महिन्यानंतर पुनर्नियुक्ती मिळविण्यासाठी वरिष्ठांच्या प्रत्येक आदेशाची पूर्तता करण्याचा खटाटोप कर्मचारी करतात. त्यांच्या याच अगतिकतेचा फायदा अधिकाऱ्यांकडून घेण्यात येत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकाने या कर्मचाऱ्यांची अडचण ओळखून त्यांना अतिशय हिन वागणूक दिली. स्वत:चा बचाव करून शासकीय अनुदानात अपहार करण्यासाठी दबाव टाकण्यात येऊ लागला. महिला कर्मचाऱ्यांना रात्री अपरात्री बोलविण्यात येऊ लागले. यवतमाळ शहरातील तीन नागरी आरोग्य केंद्रातील सहाय्यकांची तर थेट शासकीय बंगल्यावर ड्यूटी लावली. त्यांचा घरगड्याप्रमाणे वापर करण्यात येऊ लागला. एवढं सारं करूनही कर्मचाऱ्यांना गेल्या नऊ महिन्यांपासून सीएस महाशयांनी वेतन दिले नाही. शासनाकडून वेतनाचे अनुदान आले नाही अशी सबब पुढे करून त्यांचा कोंडमारा सुरू केला. सीएस कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांनी हिम्मत दाखवत असभ्य वागणुकीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊनही कार्यवाही झाली नाही. सीएसच्या दडपशाहीच्या धोरणाची चौकशीच्या मागणीसाठी सुरू केलेल्या आंदोलनात अॅड़ श्वेता लिचडे, कविता पाठक, वैशाली फुलकर, अश्विनी मते, आरती राठोड, बी.एल कुंभेकर, पदमा मेश्राम, प्रणाली सवाई, निता आडे, डॉ. हर्षलता गायनर, डॉ. नाझीया काझी, शितल फिलीप, मेरी साने, शुभांगी ठेंगे, निता मुंडवाईक, सुरेखा रेड्डे, शितल वाळके, निता काशीकर, सुनिता किनाके, पुष्पा डोनेकर, सोनाली घायवान, शोभा मरस्कोल्हे, माधवी देशपांडे, वि.वि. सांगीकर, बिपिन चौधरी आदी सहभागी झाले. (कार्यालय प्रतिनिधी)
‘सीएस’विरोधात कर्मचाऱ्यांचा एल्गार
By admin | Updated: February 7, 2015 01:39 IST