यवतमाळ : सुरुवातीपासून पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. अशा स्थितीतही वीज कंपनीने कृषी संजीवनीच्या माध्यमातून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केली. दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील ८८ हजार शेतकऱ्यांना संकटाच्या खाईत लोटले आहे. या योजनेने वीज वितरणला ‘संजीवनी’ मिळाली असली तरी शेतकरी मात्र विजेअभावी मरणपंथाला लागल्याचे दिसत आहे.पावसाने दडी मारल्याने सध्या पिकांना पाण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांकडे सर्व साधन सामुग्री उपलब्ध असताना वीज पुरवठा मात्र सुरळीत होत नाही. अवघी दोन ते तीन तास वीज मिळत असल्याने ओलित करणे शक्य होत नाही. अनेक गावांमध्ये कमी दाबाचा वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे मोटारीही जळत आहे. अशा स्थितीत शेतकरी एकेक झाड वाचविण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र वीज वितरणला काहीही फरक पडत नाही. अशाही स्थितीत वीज वितरणने कृषी संजीवनीच्या माध्यमातून दोन हजार १२२ शेतकऱ्यांकडून एक कोटी १४ लाख ७९ हजार रुपयांची थकबाकी वसूल केल्याची माहिती पुढे आली आहे. कृषी संजीवनी योजनेंतर्गत थकबाकीदार ग्राहकांना व्याज आणि दंड माफ करण्यात आला. आणखी शेतकरी याकडे आकर्षित होतील, असा वीज वितरणचा अंदाज होता. मात्र गेल्या महिनाभरापासून विजेचे संकट आणखी तीव्र झाले आहे. पैसे भरूनही वीज मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहे. जिल्ह्यातील अनेक वीज केंद्रावर शेतकरी धावून जात आहे. यातून तोडफोडी सारखेही प्रकार घडले आहेत. मात्र त्यानंतरही वीज वितरण सुधारायचे नाव घेत नाही. दररोज वीज पुरवठा खंडित होत आहे. (शहर वार्ताहर)
एक कोटींची वसुली तरीही वीज संकट
By admin | Updated: October 5, 2014 23:12 IST