काँग्रेस पक्षाची बैठक : ज्येष्ठ नेते निरीक्षकाच्या भूमिकेत, जिल्हाध्यक्षही पंचायतीत, दुसऱ्या फळीतील नेते पुन्हा वंचितयवतमाळ : कालपर्यंत ग्रामपंचायत म्हणून गणलेल्या आणि आज नगरपंचायत म्हणून नावारूपास येऊ घातलेल्या सहा संस्थांच्या निवडणुकीची जबाबदारी काँग्रेस पक्षाने माजी मंत्री-आमदार राहिलेल्या ज्येष्ठ नेत्यांच्या खांद्यावर सोपविली आहे. हे नेते आता आपल्या कामकाजाचे रिपोर्टिंग काँग्रेस कमिटीला करणार आहे. जिल्ह्यात बाभूळगाव, कळंब, राळेगाव, झरी, मारेगाव आणि महागाव या सहा नगरपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. त्या अनुषंगाने मंगळवारी रात्री जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात बैठक पार पडली. शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके, संजय देशमुख, वामनराव कासावार, विजयाताई धोटे, विजयराव खडसे, बाळासाहेब मांगुळकर, अरुण राऊत आदी मंडळी यावेळी उपस्थित होते. नगरपंचायतीच्या निवडणुकांचे धोरण ठरविण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. त्यात प्रत्येक नगरपंचायतीसाठी पक्षाकडून निरीक्षक नेमण्याचे ठरले. त्यानुसार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याकडे झरी नगरपंचायतीची जबाबदारी सोपविली गेली. वसंतराव पुरके यांच्याकडे मारेगाव, वामनराव कासावार यांच्याकडे राळेगाव, विजयराव खडसे यांच्याकडे कळंब, विजयाताई धोटे यांच्याकडे बाभूळगाव तर संजय देशमुख यांच्याकडे महागावचे निरीक्षक म्हणून जबाबदारी सोपविली गेली. बाळासाहेब मांगुळकर हे नगरपंचायतीच्या प्रचार समितीचे प्रमुख राहणार आहे. हे सर्व निरीक्षक जिल्हा काँग्रेस कमिटीला वेळोवेळी आपला अहवाल सादर करतील. उमेदवार निवडीतही त्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी) नेत्यांना पदाचा मोह आवरेना ! ग्रामपंचायतीपेक्षा किंचित वर आणि नगरपरिषदेपेक्षा खाली असलेल्या नगरपंचायतीची जबाबदारी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांकडे दिली गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. नगरपंचायतीचे निरीक्षक होण्याचा प्रस्ताव आला तरी हे नेते तो नाकारतील, अशी अपेक्षा होती. मात्र या बैठकीत उलट चित्र होते. हे नेते निरीक्षक होण्यासाठी उत्सुक व तेवढेच आग्रही असल्याचे विसंगत चित्र दिसून आले. शिवाजीराव मोघे, वसंतराव पुरके या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाच्या शर्यतीतील नेत्यांनी नगरपंचायतीच्या निरीक्षकाची जबाबदारी मिळावी म्हणून धडपड केल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. माजी मंत्री, माजी आमदारांनी या पदासाठी नकार दिला नाही. विशेष असे, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्षच खुद्द नगरपंचायतीचे निरीक्षक बनले आहे. अर्धे राजकीय आयुष्य मंत्रीमंडळात घालविलेल्या शिवाजीराव मोघेंसारख्या ज्येष्ठ नेत्याकडे अवघे एक हजार मतदार असलेल्या झरी नगरपंचायतीची जबाबदारी सोपविली गेली आहे. वास्तविक या ज्येष्ठ नेत्यांनी नगरपंचायतीच्या निरीक्षकाची जबाबदारी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांकडे सोपवून स्वत: मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहणे अपेक्षित होते. हेच ज्येष्ठ नेते त्या नगरपंचायतीसाठी जणू स्टार प्रचारक ठरले असते. मात्र आता ते निरीक्षक असल्याने त्यांना आपल्या कामकाजाचे रिपोर्टिंग जिल्हा काँग्रेस कमिटी आणि प्रचार समिती प्रमुखांना करावे लागणार आहे. सत्ता गेल्यानंतर या नेत्यांवर काँग्रेस पक्षात किती दुर्दैवी वेळ आली, याचा हा पुरावा आहे.
नगरपंचायतींची निवडणूक माजी मंत्री-आमदारांच्या नेतृत्वात
By admin | Updated: October 1, 2015 02:22 IST